Epidemic hits KDMT budget Limit income, increase costs | केडीएमटीच्या अर्थसंकल्पाला महामारीचा बसला फटका! उत्पन्नाला मर्यादा, खर्च वाढला

केडीएमटीच्या अर्थसंकल्पाला महामारीचा बसला फटका! उत्पन्नाला मर्यादा, खर्च वाढला

 
कल्याण : कोरोना महामारीचा फटका २०२०-२१ च्या सादर झालेल्या केडीएमटी उपक्रमाच्या अर्थसंकल्पालाही चांगलाच बसला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये प्रवासी वाहतुकीला आलेली मर्यादा, परिणामी उत्पन्नात झालेली घट पाहता ११३ कोटींचा अर्थसंकल्प यंदा सुधारित म्हणून सादर करताना खर्चात ४० टक्के कपात करून तो ६८ कोटी इतका असणार आहे, तर २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प मांडताना मागील वर्षीच्या ११३ कोटींमध्ये आठ कोटींची कपात करून तो १०५ कोटींचा सादर करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

जानेवारी-फेब्रुवारी २०२० ला केडीएमटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. पण, लागलीच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू झाले. यात उत्पन्नवाढीसाठी केलेल्या उपाययोजनांवर पाणी फिरले गेले आणि याचा फटका उत्पन्नाला बसला. मार्च ते मे हे तीन महिने बससेवा पूर्णत: ठप्प होती. 

केवळ महापालिकेतील आरोग्य सेवेकरी अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच ती मोफत स्वरूपात सुरू ठेवण्यात आली होती. यात उत्पन्न बंद होते, पण इंधनावर खर्च चालूच होता. सध्या सुरू असलेल्या अनलॉकमध्ये उपक्रमाच्या ५० बस रस्त्यावर धावत आहेत. तर, आजघडीला दाेन ते अडीच लाख रुपये दैनंदिन उत्पन्न मिळत 
आहे. 

कोरोनाच्या आधी उत्पन्न साधारण साडेचार ते पाच लाखांपर्यंत होते. कोरोनाच्या प्रादुर्भावात उत्पन्नाला फटका बसला असताना इंधन खर्चात वेळोवेळी झालेल्या वाढीमुळे भविष्याचा विचार करता २०२१-२२ ला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातील खर्चात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प १०५ कोटींचा सादर केला जाणार आहे.

Web Title: Epidemic hits KDMT budget Limit income, increase costs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.