ब्राह्मणांच्या ताब्यात महाबाेधी विहारमुक्तीसाठी ठाण्यात एल्गार!
By सुरेश लोखंडे | Updated: March 25, 2025 16:59 IST2025-03-25T16:59:13+5:302025-03-25T16:59:30+5:30
‘बुध्दम शरणम गच्छामी’ अशा सुरात जांभळी नाका येथून सकाळी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात दोन ते तीन हजार लोक सहभागी होते.

ब्राह्मणांच्या ताब्यात महाबाेधी विहारमुक्तीसाठी ठाण्यात एल्गार!
ठाणे - बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खुंच्या उपस्थितीत शिव फुले शाहू आणि आंबेडकर अनुयायांनी मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्याडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
नियोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेला हा माेर्चा जांभळी नाका येथून काेर्टनाक्यावर थांबवण्यात आला. बिहार राज्यातील पाटना बोधगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्षांपासून ब्राह्मण व्यवस्थापन आहे. ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले हे महाबोधी विहार मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्यावे, यासाठी देशभर भिक्खूसंघाच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलने सुरु आहेत. त्याच्या पाठिंब्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला. ‘बुध्दम शरणम गच्छामी’ अशा सुरात जांभळी नाका येथून सकाळी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात दोन ते तीन हजार लोक सहभागी होते.
मोर्चा समितीच्या वतीने भदंत लामा यांच्या नेतृत्वाखालील भिक्खूसंघ, नानासाहेब इंदिसे,भास्कर वाघमारे राजाभाऊ चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यां जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. बोधगया महाबोधी विहार १९४९ चा कायदा त्वरीत रद्द करण्यात यावा; बोध गया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन, भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात द्यावे. बोधगया येथे उपोषण करीत असलेल्या बौद्ध भिक्खूंवर होणारा पोलिसी अत्याचार त्वरीत थांबवून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासारख्या मागण्या मोर्चात करण्यात आल्या.