भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
By नितीन पंडित | Updated: April 27, 2023 19:36 IST2023-04-27T19:35:23+5:302023-04-27T19:36:08+5:30
यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळ परब यांनी दिली आहे.

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
भिवंडी - भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १४ संचालकांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजे दरम्यान भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रात मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळ परब यांनी दिली आहे.
१८ संचालक निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केल्या नंतर व्यापारी व आडते गटातील दोन व हमाल तोलारी गटातील एक व सेवा संस्था गटातील एक असे चार सदस्य बिनविरोध निवडून गेल्याने या निवडणुकीत सेवा संस्था गटातील १० तर ग्रामपंचायत गटातील ४ अशा १४ गटातील संचालक निवडी करता हे मतदान होणार आहे .त्यासाठी सेवा संस्था मतदान साठी एक तर ग्रामपंचायत मतदाना साठी चार असे एकूण पाच मतदान केंद्र बनविण्यात आले आहेत. त्यासाठी सेवा संस्था गटातील ३३९ तर ग्रामपंचायत गटातील ११३८ मतदार मतदान करणार आहेत.
या निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून एका मतदान केंद्रावर सहा अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याने य निवडणूकीसाठी एकूण तीस मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळ परब यांनी दिली आहे.मतदान केंद्रावर १२ पुरुष पोलीस,२महिला पोलीस आणि १ पोलीस निरीक्षक तसेच एक मोबाईल व्हॅन अशाप्रकारे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी याच शाळेच्या परिसरातील स्व सौ पुष्पलता विजय जाधव सभागृहात मतमोजणी होणार आहे.