"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
By धीरज परब | Updated: December 18, 2025 23:58 IST2025-12-18T23:54:20+5:302025-12-18T23:58:07+5:30
"पैसे कमावण्यासाठी महाराष्ट्राला नासवण्याचे आणि मतदारांना नागवण्याचे काम सुरू"

"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भ्रष्टाचार, अराजकता, हिंसा, बलात्कार वाढले. जातीजातींमध्ये, धर्माधर्मांत व घराघरांत भांडणे लावली. मंत्री माणिकराव कोकाटेंना भ्रष्टाचारामुळे शिक्षा झाली, पार्थ पवारांचा जमीन घोटाळा तरीदेखील काही केले नाही. मतदार याद्यांमध्ये घोटाळे समोर येऊन पण काही केले नाही. लोकशाही फासावर लटकावणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ दरिंदेच नाही, तर जल्लाद व गजनीदेखील आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाईंदर येथील सभेत केली.
निवडणूक आयोग बेईमान
भाईंदर पश्चिमेस अमृतवाणी सत्संग मार्गवर काँग्रेसने महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी हर्षवर्धन म्हणाले, "देशाचा पंतप्रधान खोटारडा - फेकू आहे याची लाज वाटते. आतंकवाद संपवणार, १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात देणार, दरवर्षी २ कोटी नोकरी देणार, प्रत्येकाला घर-पाणी देणार असे खोटे बोलून देशाचे वाटोळे केले. पूर्वी संगणक, सॉफ्टवेअर, फोटो काही नव्हते. तेव्हा घरोघरी जाऊन मतदार याद्या केल्या गेल्या. मात्र आता सर्व तंत्रज्ञान असून देखील मतदार याद्यांचा घोटाळा होत आहे. कारण निवडणूक आयोग बेईमान आहे."
फडणवीसांवर टीकास्त्र
"विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असे फडणवीस म्हणायचे. अजित पवारांना जेलमध्ये पाठवून चक्की पिसायला लावणार होते. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नाही म्हणजे नाही म्हणत होते. मात्र लग्न केले, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत", अशी टीका सपकाळ यांनी केली.
मतदारांना आवाहन
"सत्ताधारी हे भ्रष्टाचारी बनले असून पैसे इतके खात आहेत की त्याला सीमा राहिलेली नाही. समृद्धीचे, टेंडरचे, जवळच्या बोगद्यातले पैसे घरात दाबून ठेवले. भ्रष्टाराचा पैसा कमी पडतोय म्हणून पैसे कमावण्याकरता ड्रग्सच्या फॅक्टऱ्या निघाल्या आहेत. पैसे कमावण्यासाठी महाराष्ट्राला नासवण्याचे आणि मतदारांना नागवण्याचे काम हे करत आहेत. एकनाथ शिंदे शेती करायला गावी जातात आणि त्यांचा भाऊ प्रकाश शिंदेच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी चालवली जाते. ४३ जण पकडले पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी फोन केला व ४० लोकांना पळवून लावले व केवळ तिघांवर कारवाई दाखवली. तुमचे आणि तुमच्या घरातले हात जर ड्रग्जच्या कंपनीत असतील तर उपमुख्यमंत्री हे म्हणून लाजिरवाणे आहे. आपल्या मुलांचे जीव घेत आहेत. अशा पैशातून निवडणूक आल्यावर मतदारांना प्रलोभन दाखवतात. देश आपल्यासाठी सर्वस्व आहे ही भावना ज्यांच्या मनात आहे, त्यांनी स्वाभिमानाने मतदान करा" असे आवाहन सपकाळ यांनी केले.
यावेळी मुझफ्फर हुसेन यांनी मतदार यादीतील घोटाळा हा ठरवून केलेले कटकारस्थान असून त्यातून विरोधी पक्षातील अनेकांचे उमेदवारी अर्ज रद्द करण्याचे प्रकार दमण मध्ये घडल्याचा आरोप केला.