एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, पण त्यांच्यासोबतच्या ३९ आमदारांचे काय?, आव्हाडांचा सवाल
By जितेंद्र कालेकर | Updated: October 29, 2023 19:57 IST2023-10-29T19:56:29+5:302023-10-29T19:57:57+5:30
पुन्हा वर्ग आणि वर्ण व्यवस्थेला थारा देणार नाही

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, पण त्यांच्यासोबतच्या ३९ आमदारांचे काय?, आव्हाडांचा सवाल
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेविषयी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते जर अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील; कारण त्यांना आम्ही विधानपरिषदेवर घेऊ. मग त्यांच्यासोबत आलेल्या ३९ आमदारांचे पुनर्वसन कसे करणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, मुळात शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्याने किंवा त्यांना विधानपरिषदेवर घेतल्याने प्रश्न तिथेच संपतो का? त्यांच्यासोबत आलेल्या ४० जणांपैकी तुम्ही एकाचे पुनर्वसन करणार आहात. मग उर्वरित आमदारांचे काय होणार? ते तर गेले ना जिवानीशी, त्यांचे राजकारणच संपले, असेच सूचित केले जात असल्याची प्रतिक्रीया आव्हाड यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करतांना ते म्हणाले की, सनातन धर्म कसा जन्माला हे आधी बावनकुळे यांनी सांगावे. बुद्धांनी समतेची ज्योत का पेटवली? बसवेश्वरांना कोणी छळले? ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आत्महत्या करण्यास कोणी भाग पाडले? शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणी रोखला? तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला? सावित्रीबाईंना शेण कोणी मारले? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले. जे सनातनी होते त्यांनीच हे केले? ज्यांना वर्ण आणि वर्ग व्यवस्था हवी होती, त्यांनीच हे केले. पुन्हा अशीच व्यवस्था आणण्याचा विचार सुरु आहे, तो आम्ही चालू देणार नाही, असा इशाराही आव्हाड यांनी भाजपला दिला आहे.