Mira Bhayander Municipal Corporation Election : धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी महायुतीसाठी समन्वय समिती गठीत केल्या नंतर भाजपाआमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत युतीसाठी अटीशर्ती जाहीर केल्या आहेत. भाजपाची एकही अशी जागा नाही जी शिवसेनेच्या बळावर जिंकून येईल. परंतु शिवसेनेच्या जागा भाजपच्या पाठिंब्या शिवाय निवडून येऊ शकत नाही असे आ. मेहता म्हणाले. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष पाठोपाठ आ. मेहतांनी देखील मीरा भाईंदर मध्ये शिंदेसेनेशी युती होणार नाही अशी भूमिका कायम ठेवली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत आपलेच एकहाती वर्चस्व रहावे आणि युतीच्या बेड्यात अडकू नये अश्या प्रकराची भूमिका भाजप आ. मेहता यांनी घेतलेली दिसतेय. ९५ पैकी भाजपा कडे ६५ नगरसेवक व शिवसेने कडे १७ नगरसेवक असल्याने ६५ जागा भाजपाला, १७ जागा शिंवसेनेला व उरलेल्या १३ जागा सम प्रमाणात वाटून घ्यायच्या असा फॉर्म्युला त्यांनी सुरवातीला दिला होता. मेहतांच्या फॉर्म्युल्यावर मंत्री सरनाईक यांनी, २०१७ साली शिवसेनेचे २२ नगरसेवक असले तरी आता ताकद वाढली असून ५० टक्के जागा हव्या अशी भूमिका मांडली. आ. मेहतांनी संकल्प सभा घेऊन निवडणूक प्रचाराचा नारळ फोडत मंत्री सरनाईक यांच्यावर नाव न घेता आरोप व टीका केली आणि भाजपा स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात विविध महापालिका निवडणुकीत युती बाबत बैठक झाल्यावर चव्हाण यांनी मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुती समन्वय समिती गठीत केली. गुरुवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी, आम्हाला युती नको असे सांगतानाच स्वबळावर ७० जागा जिकंण्याची आमची क्षमता असल्याचे म्हटले. तर मंत्री सरनाईक यांनी भाजपा मोठा भाऊ असल्याने त्यांना थोड्या जास्त जागा देण्याची तयारी दर्शवली.
युती बाबत समितीची बोलणी झाली नसतानाच शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन शिंदेसेनेशी युती होणार नाही अश्या अटीशर्ती आणि जागेची आकडेवारी मांडली. आ. मेहता यांनी सांगितले कि,. मंत्री सरनाईक यांनी युतीच्या बैठकी बाबत कॉल केला होता. मीरा भाईंदर मध्ये भाजपाचा मतदार वाढला असून भाईंदर पश्चिम पूर्ण भागात आम्हाला सेनेची गरज नाही. मीरारोडच्या शांती नगर परिसरात आमची लढत काँग्रेस बरोबर आहे. तिकडे हे नाहीच आहेत. भाईंदर पूर्व केबिन रोड, जेसलपार्क हा भाजपाचा पट्टा आहे. आम्ही आमच्या दम वर जिंकतो. त्यामुळे ह्या जागा घ्या, त्या घ्या असे चालणार नाही. भाजपा तुम्हाला पाठिंबा देईल तर तुम्ही जिंकू शकता. भाजपाने पाठिंबा दिला नाही तर तुम्ही जिंकू शकत नाही. आमची एकही अशी जागा नाही कि जी शिवसेनेच्या बळावर जिंकता येईल. मात्र सेनेच्या सर्व जागा ह्या भाजपच्या बळावर जिंकता येतील एखाद अपवाद सोडला तर असे जाहीरपणे सांगत आ. मेहतांनी शिंदेसेनेचा पाणउतारा केला.
आ. मेहतांनी शिंदेसेनेशी युती करायची असेल अटीशर्तीच जाहीर केल्या. ९५ पैकी आमच्या ६६ जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटास ८ जागा दिल्या आहेत. त्यामुळे ह्या ७४ जागा सोडून बाकी उरलेल्या २१ जागांवर युती बाबत चर्चा करावी असे आ. मेहतांनी सांगत शिंदेसेनेला २१ जागां मधील आणखी काही जागा भाजपाला हव्यात असे संकेत दिले. या शिवाय भाजपाचे कार्यकर्ते शिंदेसेनेने घेतले ते परत करावेत आणि शिवार उद्यान टाऊनपार्क आरक्षणातील लग्नाचा हॉल केलाय तो काढून टाकावा आणि ती जागा टाऊनपार्क म्हणून वापरावी आणि मगच महायुती वर बोलावे असे जाहीर केले आहे. आ. मेहतांच्या अटीशर्तीच्या मुळे मीरा भाईंदर मध्ये भाजपला शिंदेसेनेशी युती करायची नाही असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.