एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 06:05 IST2025-12-20T06:04:50+5:302025-12-20T06:05:05+5:30
राज्यात महायुतीची घोषणा केल्यानंतर मुंबई, ठाण्यातील निवडणुका महायुतीत लढविण्याची तयारी वरिष्ठांनी केली.

एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
ठाणे : ठाण्यात शिंदेसेनेबरोबर युती नकोच, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या भाजपच्या १८ मंडल अध्यक्षांनी गुरुवारी सायंकाळी झालेल्या भाजपच्या कुटुंब मेळाव्यात मात्र, मवाळ भुमिका घेतली. युती करण्यापेक्षा मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह भाजप पदाधिकाऱ्यांनी धरला. तसेच युतीशिवाय पर्याय नसेल तर समसमान जागावाटप करावे, असा सूरही पदाधिकाऱ्यांनी आळवला. त्यामुळे ठाण्यातील युतीचे घोडे अडणार की, वरिष्ठ नेत्यांनी डोळे वटारल्यावर सुसाट धावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात महायुतीची घोषणा केल्यानंतर मुंबई, ठाण्यातील निवडणुका महायुतीत लढविण्याची तयारी वरिष्ठांनी केली. ठाण्यात भाजपबरोबर युती करणार असल्याचे शिंदेसेनेने जाहीर केले. मात्र, भाजपमध्ये या निर्णयाच्या विरोधात सूर उमटू लागले. भाजपच्या मंडल अध्यक्षांनी थेट मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांना पत्र लिहून युतीला विरोध केला. नाराजांची समजूत काढण्याकरिता गुरुवारी सांयकाळी भाजपच्या वतीने कार्यकर्ता कुटुंब मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला भाजपचे आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले आर्दीसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांचा सूर काहीसा मवाळ झाला. युती करायचीच असेल तर ज्या ज्या ठिकाणी भाजपचे प्राबल्य वाढले आहे, त्याठिकाणी मैत्रिपूर्ण लढती घ्याव्यात. तसेच युतीमध्ये भाजपला समसमान जागा मिळाव्यात, अशी मागणी लावून धरण्यात आली. आता कसोटी शिंदेसेनेची असून, ते समसमान जागांना मान्यता देतात किंवा कसे? मैत्रिपूर्ण लढतीचा प्रस्ताव स्वीकारतात किंवा कसे, यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे.