दसरा महागला! फुल बाजार ‘सोन्या’ ने सजले; पावसामुळे फुलांची आवक कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 15:48 IST2020-10-24T15:47:39+5:302020-10-24T15:48:10+5:30
Kalyan market: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबाजी पोखरकर यांनी सांगितले की, पावसामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. बाजारात दरवर्षी झेंडू फुलांच्या एक हजार गाड्या येतात. मात्र यंदा ५०० गाड्या आल्या आहेत. त्यामुळे ५० टक्के फुलांची आवक कमी झाली आहे.

दसरा महागला! फुल बाजार ‘सोन्या’ ने सजले; पावसामुळे फुलांची आवक कमी
कल्याण : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तानिमित्ताने फूल बाजारात नागरिक जमत आहेत. कल्याणनगरीतील फुल बाजार आपट्याच्या पानांनी (सोन्याने) सजले आहे. फुलबाजार रंगबेरंगी फुले आणि हिरव्या पानांनी बहरल्याचे दिसून आले. कोरोना काळ आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थितीमुळे आवक कमी असून किमती वाढल्या आहेत, तरीही खरेदी-विक्री सुरू असून बाजारात एक कोटींची उलाढाल झाली.
बाजारात कापरी, पिवळा, नामधारी, लाल या प्रकारातील झेंडूच्या फुलांची खरेदी-विक्री होत होती. १०० ते १५० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. देवीच्या पूजेसाठी वापरली जाणारी शेवंती ३०० रुपये किलो आहे. यासह अस्टर, मोगरा, जाई, जुई, चाफा, गुलछडी, गुलाब, सोनचाफा, जरभरा या फुलांचा बाजार सुरू आहे. वेणी, गजरा बनविण्यासाठी मोगरा, जाई, जुई फुले खरेदी केली जात आहे. यासह झेंडूच्या फुलांचा एक मीटर हार ४० ते ६० रुपये, तोरण ३० ते ५० रुपये, पूजेसाठी लागणारे बेल पान, तुळस, दुर्वा ५ ते १० रुपये जुडीप्रमाणे विकले जात आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबाजी पोखरकर यांनी सांगितले की, पावसामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. बाजारात दरवर्षी झेंडू फुलांच्या एक हजार गाड्या येतात. मात्र यंदा ५०० गाड्या आल्या आहेत. त्यामुळे ५० टक्के फुलांची आवक कमी झाली आहे.
घाऊक फुल व्यापारी भाऊ नरवडे यांनी सांगितले की, फुलांची आवक पुणे, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद येथून झाली आहे. फुलांचे दर चढत-उतरत आहेत. शनिवारी, १०० ते १५० रुपये या दराने फुलांची विक्री होत आहे. गुलछडी ४०० रुपये किलो, अस्टर २५० किलो, कापरी १५० किलो, मोगरा ८०० ते एक हजार रुपये किलो, गुलाब २०० रुपये जुडी आहे. सध्या बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल सुरू झाली. परंतु, ही उलाढाल मागीलवर्षी दीड ते दोन कोटींची होती.
आपट्याच्या पानांना सोनेरी रंग देऊन त्यांना योग्यरित्या पॅकिंग करुन ‘२४ कॅरेट सोने’ म्हणून एक आपट्याचे पान ५ ते १० रुपयांना विकले जात होते. आपट्याची पाने कसारा, आसनगाव, मुरबाड, शहापूर या ठिकाणच्या जंगलाच्या भागातून आणली जात आहेत. आपट्याची पाने २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे विकली जात आहेत, असे विक्रेत्यानी सांगितले.