महावितरणचे वीज बील थकवल्याने डोंबिवलीतील बीएसएनएल कार्यालये अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:31 IST2019-03-06T00:31:39+5:302019-03-06T00:31:47+5:30
डोंबिवलीतील बीएसएनएलच्या चार केंद्रांच्या कार्यालयांनी चार महिन्यांपासून सुमारे १५ लाख ६० हजारांचे वीजबिल थकवल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे.

महावितरणचे वीज बील थकवल्याने डोंबिवलीतील बीएसएनएल कार्यालये अंधारात
डोंबिवली : डोंबिवलीतील बीएसएनएलच्या चार केंद्रांच्या कार्यालयांनी चार महिन्यांपासून सुमारे १५ लाख ६० हजारांचे वीजबिल थकवल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दोन-तीन दिवसांपासून अंधारात काम करावे लागत असून शहरातील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा कोलमडल्यामुळे ग्राहकांच्या प्रश्नांना तोंड देताना तारांबळ उडत आहे.
पूर्वेतील एमआयडीसी, मानपाडा स्टार कॉलनी, टिळकनगर, तर पश्चिमेतील कोपर रोड, आनंदनगर या बीएसएनएल कार्यालयांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कार्यालयांत एकूण पाच कनेक्शन असून चार महिन्यांच्या थकबाकीबाबत नोटीस बजावूनही बिल भरले नाही आणि नोटिशीला साधे उत्तरही दिले नाही. त्यामुळे नाइलाजाने महावितरणला हे पाऊ ल उचलावे लागले, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज दिक्कड यांनी सांगितले. १५ लाख ६० हजारांचे बिल थकल्याने वरिष्ठांकडून विचारणा होत होती. याशिवाय मार्चमध्ये आॅडिट असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे दिक्कड यांनी सांगितले.
दूरध्वनी बंद असल्याने ग्राहक दूरध्वनी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारत आहेत. मात्र, कार्यालयातून काहीच माहिती मिळत नसल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. शहरात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या खोदकामांमुळे तांत्रिक अडचण उद्भवल्याची चर्चा होती; मात्र याबाबत महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता खरा प्रकार उघड झाला.
दरम्यान, बीएसएनएलएच्या विभागीय व्यवस्थापकांशी याबाबत मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
ग्राहकांना मनस्ताप
बीएसएनएलच्या सावळ्या गोंधळामुळे दूरध्वनी आणि ब्रॉडबॅण्ड ग्राहक वैतागले आहेत. कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेले असता तेथून काहीच माहिती मिळत नसल्याने ग्राहकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांचे कर्मचाºयांशी खटके उडत असून काही जण तर कनेक्शनच काढून टाका, असे सांगत असल्याचे कार्यालयांमध्ये पाहायला मिळत आहे. इंटरनेट सेवा कोलमडल्याने कामे खोळंबली आहेत, असे एका ग्राहकाने सांगितले.