आगाऊ फीवसुलीच्या तक्रारीमुळे दिला दाखला
By Admin | Updated: May 8, 2017 05:57 IST2017-05-08T05:57:23+5:302017-05-08T05:57:23+5:30
येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकाने सहावीतील संविधान रवींद्र चंदणे याचा निकाल देताना सातवीचे प्रवेश शुल्क आगाऊ मागितले

आगाऊ फीवसुलीच्या तक्रारीमुळे दिला दाखला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकाने सहावीतील संविधान रवींद्र चंदणे याचा निकाल देताना सातवीचे प्रवेश शुल्क आगाऊ मागितले. याबाबत, त्याच्या पालकांनी मुख्याध्यापक घोडके यांना विचारणा केली असता शाळेने थेट संविधान याचा शाळा सोडल्याचा दाखलाच त्याच्या पालकांच्या हातात ठेवला.
संविधान याने गेल्या शैक्षणिक वर्षाची फी १०८० एवढी भरली. त्यानंतर, पुन्हा त्याच्या पालकांकडून १२०० रु. घेतले. यानंतरही तो सहावीचा निकाल आणण्यासाठी शाळेत गेला असता, फी न भरल्याने तुझा निकाल मिळणार नाही, असे शिक्षकांनी सांगितले. ही बाब संविधान याने घरी जाऊन सांगताच त्याच्या वडिलांनी शाळेत चौकशी केली. शिक्षक आणि मुख्याध्यापक प्रकाश घोडके यांनीही त्यांना आगाऊ फी भरण्यास सांगितले. यावर, माझ्या मुलाने अद्याप सातवीत प्रवेशही घेतला नसताना, आगाऊ फी कशी घेता, अशी विचारणा करत मुलाचा दाखला मागितला. मुख्याध्यापकांनीही नियम धाब्यावर बसवत दाखला दिला. अद्याप कोणत्याच शाळेत प्रवेश न मिळाल्याने वर्ष वाया जाण्याची भीती त्याच्या पालकांना सतावत आहे.
संविधान चंदणे याच्या आईने फी भरली होती. मात्र, याची माहिती नसल्याने नजरचुकीने त्याची फी घेण्यात आली. ती फी आम्ही परत करणार आहोत. तर, संविधानच्या पालकांनी आम्ही त्याला म्हशी सांभाळायला ठेवणार असल्याचे सांगितल्याने त्याचा दाखला दिला.
- प्रकाश घोडके, मुख्याध्यापक