गुरांअभावी गोबर गॅस झाला दुर्मीळ
By Admin | Updated: February 11, 2017 03:44 IST2017-02-11T03:44:37+5:302017-02-11T03:44:37+5:30
ग्रामीण भागात घरगुती इंधनासाठी जंगलाची होणारी बेसुमार जंगलतोड थांबविण्यासाठी पर्याय म्हणून शासनाने गोबर गॅसला चालना दिली होती.

गुरांअभावी गोबर गॅस झाला दुर्मीळ
राहुल वाडेकर ,विक्रमगड
ग्रामीण भागात घरगुती इंधनासाठी जंगलाची होणारी बेसुमार जंगलतोड थांबविण्यासाठी पर्याय म्हणून शासनाने गोबर गॅसला चालना दिली होती. मात्र, ग्रामीण भागात गुरांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने गोबर गॅससाठी लागणारे शेण पाहिजे त्या त्याप्रमाणात उपलब्ध होत नाही. तर आधुनिक युगात कष्ट न करता गॅसचे सिलेंडर उपलब्ध होत असल्याने गोबर गॅसही दुर्मिळ होत चालले आहेत़
ग्रामीण भागात लाकूड इंधनाला पर्याय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना व गुरांच्या मालकांना अनुदानातून गोबरगॅस दिले. जनावरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या गोबर गॅसचा वापर घरातील स्वयंपाकासाठी होतो. या इंधनाबरोबरच घरातील दिव्यासाठीही गोबर गॅसचा उपयोग होत होता़ त्यामुळे या योजनेला विक्रमगड तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत होता़ खेडेगावातील बहुतेक सधन शेतकऱ्यांच्या घरात या गोबर गॅसचा वापर होत होता़ परंतु काही वर्षापासून आधुनिक युग व गुरांचे प्रमाण कमी होऊन शेण मिळेनासे झाल्याने गोबर गॅसचा वापर आपोआप कमी होत गेला.
आधुनिक युगातील रेडीमेड सिलेंडर गॅसचा वापर दिसू लागला आहे़ मात्र, लोकसंख्येच्या मानाने गॅस सिलेंडर व रॉकेलचा पुरवठा कमी होत असल्याने त्यामध्ये होणारी सततची भाववाढ, कृत्रिम इंधनाचा आरोग्यावर होणारा विपरित परिणाम, वाढती महागाईमुळे पुन्हा गोबर गॅसचा पर्याय निवडण्याची गरज निर्माण असल्याचे जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे़ गोबर गॅस हा गुरांच्या शेणापासून तयार होतो़ रोजच्या वापरात किमान चार ते पाच घमेली शेणाची आवश्यकता आहे़ परंतु आधुनिक युगात सारेच महाग झाल्याने या महागाईचा परिणाम गुरांच्या खरेदीवर व त्यांना लागणाऱ्या खाद्यावर होतो़
परिणामी, गुरे पाळणे तितकेसे सोपे राहिलेले नाही़ कारण जंगल संपत चालल्याने गुरांना भरपूर चारा मिळणे कठीण झाले आहे़ नवीन खरेदी करण्यास हाताला पैसा नाही़ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ओंदे गावात ५० वर्षांपूर्वीची शेगडी
आजही गेल्या ५० वर्षांपासून गोबर गॅस वापरणारे ओंदे येथील शेतकरी विजय दामोदर सांबरे यांनी हा प्रकल्प आजही जोपासलेला असून आजही ते जवळजवळ ५० जणांचे जेवण, नास्ता, चहा करीत असून घरामध्ये सर्वासाठी फक्त गोबरगॅसचा वापर हात आहे़ त्यांचेकडे ५० वर्षांपुर्वीची गॅसशेगडी असून शेतापासून ते स्वयंपाकघरापर्यत गॅस पाईप लाईनही तेवढीच जुनी आहे़
त्यामध्ये त्यांनी आजही बदल केलेला नसून त्यांच्या या गोबर गॅसचा ते अजुनही पूर्ण क्षमतेने वापर करीत आहे़ त्यामुळे त्यांचे हजारो रुपयांची महिन्याची बचत होत आहे़ कारण त्यांचेकडे रोज ५० माणसांचे जेवण केले जाते. कारण ते हॉस्टेल चालवित असून तेथे राहाणाऱ्या विद्यार्थ्याच्या जेवणाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांना गोबर गॅस हा बिना पैशात मिळत आहे़ तसेच त्यांनी शेण मिळविण्याकरीता व दुधाकरीताही दोन म्हशीच विकत घेतल्या आहे़ आजही त्यांचेकडे गेल्यावर ५० वर्षांपासुन चालत आलेला गोबर गॅस व त्याचे साहित्य पाहावयास मिळेल़