जानेवारी संपताच मोखाड्याला कोरड
By Admin | Updated: February 15, 2016 02:55 IST2016-02-15T02:55:20+5:302016-02-15T02:55:20+5:30
तालुक्यातील गावपाड्यांपुढे भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. जानेवारीच्या अखेरच म्हणजे दोन महिने आधीच पाणीटंचाई उद्भवली आहे.

जानेवारी संपताच मोखाड्याला कोरड
रवींद्र साळवे, मोखाडा
तालुक्यातील गावपाड्यांपुढे भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. जानेवारीच्या अखेरच म्हणजे दोन महिने आधीच पाणीटंचाई उद्भवली आहे. त्यामुळे परंपरागत टंचाईग्रस्त गावपाड्यांनी टँकरद्वारे तत्काळ पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी केली आहे. पर्जन्याचे प्रमाण घटल्याने सर्व उपाययोजनेचा बोजवारा उडाला असून ४५ वर्षांपूर्वी अर्थात १९७० मध्ये मोखाडा, जव्हारमध्ये जाणवलेली भीषण पाणीटंचाई यंदा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात प्रतिवर्षी सुमारे ३ हजार मिमी पावसाची नोंद होते. मात्र, यंदा मोखाड्यात सरासरी केवळ १ हजार ८५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षीच टंचाईग्रस्त असलेल्या गावपाड्यांमध्ये विहिरींनी तळ गाठला असल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीटंचाईसाठी संवेदनशील असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या गावपाड्यांमध्ये गोळीपाडा, घामोडी, दापटी, धामणी, स्वामीनगर आसे, तुगारवाडी, ब्राह्मणगाव या गावपाड्यांसह गवरीचापाडा, पेडक्याचीवाडी यांचा समावेश आहे.
टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार...
मागील वर्षी ३१ गावे आणि ४९ पाडे अशा एकूण ८० गावपाड्यांतील पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले होते. त्यासाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. परंतु, या वर्षी ही स्थिती भयावह होणार आहे, असे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी मार्च महिन्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, यंदा तो आताच सुरू करावा लागणार आहे व पाणीटंचाईत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून बोलले जात आहे. रोजगार हमी योजनेतून विहीर योजनेसाठी ४ कोटी मिळूनही सिंचनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. जिल्हा प्रशासनाने २८ ग्रामपंचायतींमध्ये २१५ विहिरींना सन २०११ ते २०१२ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली. परंतु, यापैकी ४९ विहिरी रद्द केल्या आणि आतापर्यंत फक्त ४२ सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत.
९३ विहिरी अपूर्ण आहेत. रद्द झालेल्या ८५ विहिरींचे प्रस्ताव स्थानिक प्रशासनाने पाठवले आहेत, तर अद्यापपर्यंत ५१ विहिरींच्या कामांना सुरुवातच करण्यात आलेली नाही. यावरून कोट्यवधींचा निधी उपलब्ध होऊनही स्थानिक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सिंचनाच्या प्रश्न मार्गी लागलेला नाही.
पाणी अडवा पाणी जिरवा, ही संकल्पनाही लघुपाटबंधारे विभागाने बासनात गुंडाळली. तालुक्यातील सिंचनाची समस्या सुटावी, यासाठी २०१२-१३, ते २०१४-१५ च्या दरम्यान ३ कोटी १९ लाख ६६ हजार खर्च करून तालुक्यातील गावपाड्यांमध्ये २० बंधारे बांधले आहेत. परंतु, सदोष बांधकामांचा अभाव असल्याने या बंधाऱ्यांना गळती लागली असून त्यात एक थेंबही पाणी नाही.
संपूर्ण मोखाडा तालुका टंचाईमुक्त व टँकरमुक्त करणार, असे आश्वासन मंत्री महोदयांनी अनेकदा आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे. यामुळे याकडे गंभीरतेने लक्ष देऊन मोखाडा तालुका टँकरमुक्त करण्याची गरज आहे.