ढोल-ताशा वाजणारच!
By Admin | Updated: March 25, 2017 01:26 IST2017-03-25T01:26:27+5:302017-03-25T01:26:27+5:30
आयोजक पाठीशी राहिले नाहीत, तरी चालेल; आम्ही चौकाचौकात ढोल वाजवून आमची कला सादर करू, असा पवित्रा घेत ठाण्यातील

ढोल-ताशा वाजणारच!
ठाणे : आयोजक पाठीशी राहिले नाहीत, तरी चालेल; आम्ही चौकाचौकात ढोल वाजवून आमची कला सादर करू, असा पवित्रा घेत ठाण्यातील ढोल-ताशा पथकांनी यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल वाजणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. मनसेने या पथकांसोबत असल्याचा पुनरूच्चार केला, तर शिवसेना, भाजपासह अन्य राजकीय पक्षांनी नव्याने कोणतीही भूमिका घेतली नाही. सरकारने पारंपरिक वाद्यांना उत्सवासाठी सवलत देण्याचे आश्वासन दिल्याने त्याबाबतचे आदेश हाती पडल्यावर पोलीस याबाबत सुधारित आदेश काढणार आहेत.
दरम्यान, शुक्रवारी पथकांसोबत बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढू असे सांगणाऱ्या आयोजकांनी संध्याकाळपर्यंत बैठक घेतली नाही. आम्हालाही निरोप दिला नाही, असे पथकांनी सांगितले. त्याबाबत चौकशी केल्यावर रात्री उशिरा काही पथकांना फोन करून चर्चेसाठी पाचारण केले. मनसेने मात्र दिवसभरात विविध पथकांशी बोलून त्यांना धीर दिला. त्याचवेळी या पथकांची एकत्र संघटना स्थापन करून त्याचे नेतृत्त्व करण्यासाठी काहींनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी बैठकही झाली. अशी संघटना स्थापन झाल्यावर तिच्या नेतृत्त्वाखाली विविध पक्ष, संघटनांशी वाटाघाटी करण्याचा पवित्रा काही पथकांनी जाहीर केला. आयोजकांनी मात्र याबाबतच्या कोणत्याही विषयावर काहीही भूमिका न घेता पथके, पोलीस, पक्ष जो निर्णय घेतील त्याची वाट पाहण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांनी याबाबत स्वत:हून कोणताही पुढाकार घेतला नाही.
आवाजाच्या मर्यादेमुळे ढोल-ताशा पथकांना यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी करुन न घेण्याचा निर्णय आयोजकांनी जाहीर केला, पण वाटाघाटींचा पर्याय खुला ठेवला होता. आयोजकांच्या या भूमिकेला ठाण्यातील सर्व ढोल-ताशा पथकांनी हरकत घेतली आणि आमची बाजू ऐकून न घेता परस्पर निर्णय घेतल्याने आता आमंत्रण दिले तरी स्वागतयात्रेत जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. या पथकांची बैठक शुक्रवारी झाली. यात काही पथकांनी स्वागतयात्रेत आम्ही वादन करण्याचे जाहीर केले, पण हे वादन न्यासाच्यावतीने नव्हे तर वैयक्तिक स्तरावर असेल, असे जाहीर केले. गुन्हे दाखल होत असतील तर होऊ दे; पण वादन करणार हे नक्की असे ठरविले आहे. या पथकांशी चर्चेबाबत विश्वस्तांना संध्याकाळी विचारल्यावर त्यांनी अद्याप बैठक झाली नसल्याचे सांगितले; पण पथके जर वादन करत असतील, तर त्याला आमची हरकत नाही. पण त्याच्या परिणामांची जबाबदारी आमची नसेल, अशी भूमिका घेतली. (प्रतिनिधी)