मुंब्रा, पारसिक डोंगरावरील झोपड्यांचा ‘ड्रोन’द्वारे सर्व्हे, आयुक्तांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 06:54 IST2018-09-27T06:54:13+5:302018-09-27T06:54:21+5:30
मुंब्रा आणि पारसिकच्या डोंगरावरील वनविभागाच्या जागेत दिवसेंदिवस अनधिकृत झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या झोपड्या भविष्यात घातक ठरू शकतात.

मुंब्रा, पारसिक डोंगरावरील झोपड्यांचा ‘ड्रोन’द्वारे सर्व्हे, आयुक्तांची घोषणा
ठाणे - मुंब्रा आणि पारसिकच्या डोंगरावरील वनविभागाच्या जागेत दिवसेंदिवस अनधिकृत झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या झोपड्या भविष्यात घातक ठरू शकतात. त्यामुळे वेळीच वनविभागाने लक्ष घालून संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वनविभागाकडे केली आहे. या भागातील झोपडपट्ट्यांचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्व्हे करण्यात येऊन तो वनविभागाच्या सचिवांकडे पाठवला जाईल, असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंब्य्रातील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्ता रुंदीकरणाच्या कामासह पारसिक बोगद्यावरील कचरासफाईच्या कामाची पाहणी आयुक्तांनी केली. यावेळी त्यांच्या नजरेस विदारक दृश्य पडले. मुंब्य्राचा असो अथवा पारसिक बोगद्याचा डोंगर असो, या ठिकाणी दिवसागणिक झोपड्यांचे प्रमाण वाढत आहे. आणखी काही दिवसांनी तर येथे डोंगर होता का, अशी म्हणण्याची वेळ येणार आहे. मुंब्रा बायपासवरील डोंगरावर थेट वरपर्यंत झोपड्या वाढत आहेत. परंतु, याकडे कोणाचेही लक्ष नाही. वनविभागाची जागा असल्याने त्यांनीच ही कारवाई करावी, अशी पालिकेची भूमिका आहे.
ठाणे महापालिका आयुक्त संजिव जयस्वाल यांनी बुधवारी पारसिक भागाची पाहणी करत असताना येथील डोंगरावर दिवसागणिक वाढत असलेल्या झोपड्यांच्या अतिक्रमणाबाबत तीव्र चिंता
व्यक्त केली.
या झोपड्यांना आवर घालण्यासाठी वनविभागाने तातडीने मुंब्रा आणि पारसिक या ठिकाणी संरक्षक भिंत उभारावी, असे मत आयुक्तांनी यावेळी व्यक्त केले. अतिक्रमण करून येथील एक-एक झोपडी दीड लाखात विकली जात आहे.
या भागात नेमक्या किती झोपड्या आहेत, याची माहिती मिळवण्यासाठी ड्रोन कॅमेºयाद्वारे सर्व्हे केला जाणार आहे. ती माहिती वनविभागाच्या सचिवांना दिली जाणार असल्याचे सांगून, आयुक्तांनी येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली.
विकासासाठी १० कोटींचा निधी
ठाणे : मागील कित्येक वर्षे पारसिक बोगद्यावर साचलेल्या कचºयाचे ढीग हटवण्याची मोहीम अखेर ठाणे महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार, मागील १५ दिवसांत येथून तब्बल ७० मेट्रिक टन कचरा उचलला आहे. तर, अजून ५० ते ६० मेट्रिक टन कचरा २ आॅक्टोबरपर्यंत काढून या परिसराचे रूपडे पालटणार असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला. तसेच येथील वाघोबानगर आणि भास्करनगरच्या विकासासाठी १० कोटींचे विशेष पॅकेज देण्याची घोषणाही त्यांनी बुधवारी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बोगद्यावर वृक्षारोपणाची मोहीमसुद्धा राबवली. यावेळी त्यांच्यासमवेत उपायुक्त मनीष जोशी, संदीप माळवी, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक प्रकाश बर्डे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
डम्पिंग परिसर विकासासाठी २० कोटी
दरम्यान, दोन शाळांच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पारसिक बोगद्यावर तीनशेहून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. दुसरीकडे डायघर डम्पिंग ग्राउंड भागातील नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी तसेच येथील विकासकामांसाठी १५ ते २० कोटींचे विशेष पॅकेज दिले जाणार असल्याचेही यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले.
पारसिक परिसर करणार चकाचक
भास्करनगर आणि वाघोबानगरला जोडणारा पारसिक बोगदा हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. या दोन्ही भागांत झोपडपट्टीचे साम्राज्य अधिक आहे. याच भागातून निर्माण होणारा कचरा हा पारसिक बोगद्यावर टाकला जात होता. परंतु, मागील १५ दिवसांत येथून पालिकेने रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ७० मेट्रिक टन कचरा काढला आहे.
पारसिक बोगद्यावर ५० ते ६० मेट्रिक टन कचरा शिल्लक असून, तो २ आॅक्टोबरपर्यंत काढून येथील परिसर चकाचक केला जाणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. याठिकाणी खालील बाजूस एका उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे. रेल्वेकडे चर्चा व पत्रव्यवहार करून संरक्षक भिंत उभारण्यास सांगितले जाणार आहे.
झोपड्यांमुळे रेल्वे अपघात होत असल्याने त्या हटवल्या जातील. एक जलकुंभ उभारला जाणार असून भास्करनगर आणि वाघोबानगरच्या विकासासाठी १० कोटींचे विशेष पॅकेज दिले जाणार असल्याचे आश्वासन देऊन तसा प्रस्ताव आॅक्टोबरमधील महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला जाणार आहे.