गृहप्रवेश करण्यापूर्वीच झाला स्वप्नांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST2021-05-05T05:05:49+5:302021-05-05T05:05:49+5:30

भिवंडी : जमीनमालक व विकासक यांच्यातील वादामुळे पद्मावती इस्टेटमधील इमारतींवर झालेल्या ताेडकामामुळे सुमारे १७० कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. आयुष्याभराची ...

Dreams were shattered before entering the house | गृहप्रवेश करण्यापूर्वीच झाला स्वप्नांचा चुराडा

गृहप्रवेश करण्यापूर्वीच झाला स्वप्नांचा चुराडा

भिवंडी : जमीनमालक व विकासक यांच्यातील वादामुळे पद्मावती इस्टेटमधील इमारतींवर झालेल्या ताेडकामामुळे सुमारे १७० कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. आयुष्याभराची जमापुंजी लावून स्वतःचे घर खरेदी करणाऱ्या या कुटुंबांच्या स्वप्नांचा सोमवारी चुराडा झाला. यापैकीच एक शिंदे परिवार तीन ते चार दिवसांनंतर पद्मावती इस्टेटमधील आपल्या स्वतःच्या घरात राहायला येणार हाेता. मात्र, त्याआधीच एमएमआरडीए त्यांची इमारत पाडल्यामुळे त्यांच्या स्वत:च्या घराचे स्वप्न हवेतच विरले आहे.

ठाणे येथील शिवाईनगरमध्ये मनाेज शिंदे (वय ४०) त्यांच्या कुटुंबासाेबत राहतात. त्यांनी स्वत:च्या घराचे स्वप्न पाहिले. ठाण्यालगत असलेल्या भिवंडीतील कशेळी येथील पद्मावतील इस्टेटमध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी घर घेतले हाेते. ५५० चौरस फुटांच्या या घरासाठी शिंदे यांनी २२ ते २५ लाख रुपये बिल्डरला दिले आहेत. यासाठी त्यांनी आपल्याकडील मालमत्ता विकून त्यातून पैसे उभे केले हाेते. तसेच, ११ लाखांचे कर्जही काढले. घराच्या रजिस्ट्रेशनसाठी सुमारे दीड ते दोन लाखांची शासकीय स्टॅम्प ड्युटी भरली. यानंतर त्यांनी मे महिन्यात आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी अंतर्गत सजावटीवरही दाेन लाखांचा खर्च केला. सर्व कुटुंब आनंदात असतानाच एमएमआरडीएने शिंदे परिवाराच्या स्वप्नांवर हाताेडा मारून त्यांचा चुराडा केला. घरासाठी केलेला खर्च कसा भरून काढायचा, या चिंतेत हे कुटुंब सापडले आहे. शासनाने लवकर ताेडगा काढावा.

कोरोना संकटकाळात एमएमआरडीएने केलेली ही चुकीची कारवाई आहे. आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देताच ही कारवाई केली असून, सामान्य नागरिकांची घरे तुटताना आमच्या डोळ्यांमधील आसवे पाहायला आता एमएमआरडीए प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी येथे यायला पाहिजे होते. सध्या कोरोना संकटात केलेली ही कारवाई पूर्णतः चुकीची आहे. यावर शासनाने लवकर तोडगा काढावा, अशी प्रतिक्रिया वैशाली शिंदे यांनी दिली आहे.

Web Title: Dreams were shattered before entering the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.