डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च अडीच कोटीने वाढला
By Admin | Updated: April 25, 2017 00:10 IST2017-04-25T00:10:39+5:302017-04-25T00:10:39+5:30
घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या वर्षभरापूर्वी कोसळलेल्या पीओपीच्या छताच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असून

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च अडीच कोटीने वाढला
ठाणे : घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या वर्षभरापूर्वी कोसळलेल्या पीओपीच्या छताच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असून पालिकेने सुरुवातीला या कामासाठी २३ लाखांचा खर्च होईल, असे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात तो दोन कोटी ८५ लाखांवर गेला आहे. विशेष म्हणजे पालिका हा खर्च करणार नसून तो हिरानंदानी बिल्डर्स करणार आहे. यामध्ये आता वायरिंग, अग्निशमन प्रतिबंधात्मक योजना आणि वॉटर प्रूफिंगचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने यापूर्वी केलेल्या खर्चाच्या अंदाजपत्रकात तब्बल अडीच कोटीहून अधिक रकमेची वाढ झाल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या असून या विभागाच्या तांत्रिक कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मागील वर्षी २४ एप्रिलला रात्री १२ च्या सुमारास पीओपीचा स्लॅब १८० खुर्च्यांवर पडला होता. सुदैवाने प्रेक्षक बाहेर पडल्यानंतर ही दुर्घटना घडल्याने अनर्थ टळला होता. या घटनेमुळे पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठली होती. १५ ते २० दिवसांत दुरु स्ती काम पूर्ण करून नाट्यगृहाचा पडदा पुन्हा उघडेल, असे आश्वासन त्या वेळी देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात वर्ष लोटले तरी अद्यापही तो काही उघडला गेला नाही. पालिकेने या कामासाठी २३ लाख रु पये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून तशी निविदा काढली होती. मात्र, ती प्रक्रि या अर्धवट ठेवून हिरानंदानी बिल्डर्सकडे हे दुरुस्तीचे काम सोपवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयालाही जवळपास ६ महिने लोटले असून आता कुठे कासवगतीने ते सुरू झाले आहे.
याबाबत पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता इलेक्ट्रिकल आणि फायर सेफ्टीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तयार झाला आहे. येत्या दोन दिवसांत पीओपीसह वायरिंग आणि छताच्या वॉटर प्रूफिंगचे काम सुरू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या कामासाठी जवळपास २ कोटी ८५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)