‘लोक काय म्हणतील’ याचा विचार नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:07 IST2020-02-02T01:07:16+5:302020-02-02T01:07:31+5:30
देशात, राज्यात इतकेच काय ठाण्यासारख्या दाट लोकवस्तीच्या जिल्ह्यातील वृद्धाश्रमांची गरज वाढत आहे. शहरात जागेची टंचाई आहे. वन-बीएचके किंवा टू-बीएचके ...

‘लोक काय म्हणतील’ याचा विचार नकोच
देशात, राज्यात इतकेच काय ठाण्यासारख्या दाट लोकवस्तीच्या जिल्ह्यातील वृद्धाश्रमांची गरज वाढत आहे. शहरात जागेची टंचाई आहे. वन-बीएचके किंवा टू-बीएचके फ्लॅटमध्ये नवरा-बायको व दोन लहान मुलांच्या कुटुंबासमवेत एखादी ७५ किंवा ८० वर्षांची अथवा त्यापेक्षा जास्त वयाची वृद्ध व्यक्ती असेल, तर त्यांना सांभाळण्याची मोठी समस्या निर्माण होते.
नवरा-बायको दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर जातात, तर मुले शाळेत किंवा कॉलेजात व्यस्त असतात. अशावेळी घरातील वृद्ध व्यक्तीला कुणी पाहायचे? दरवाजाला कुलूप लावून आतमध्ये वृद्ध व्यक्तीला बंद करून जाता येत नाही. अशावेळी ब्युरोमधून अटेंडंट नियुक्त करण्याचा पर्याय असतो. हा अटेंडंट १२ तासांच्या शिफ्टकरिता किमान ६०० रुपये घेतो. म्हणजे, महिनाकाठी १५ ते १८ हजारांचा खर्च सहज होतो.
शिवाय, इतका पैसा खर्च केल्यावरही आपल्या जीवाभावाच्या वृद्ध व्यक्तीची तो अटेंडंट किती काळजी घेतो, ही शंकेची पाल मनात चुकचुकते. शिवाय, घराच्या सुरक्षेची भीती सतत मनात राहते. मुंबईत एका अटेंडंटने घर लुटल्याची घटना मागे घडली होती, तर विलेपार्लेसारख्या सुशिक्षितांच्या वस्तीत दोन वृद्धांचे खून झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मग इतकी रक्कम खर्च करून घरातील वृद्ध व्यक्ती सांभाळण्याकरिता अटेंडंट ठेवणे सयुक्तिक आहे का?त्यामुळे अशा परिस्थितीत अधिकाधिक उत्तम दर्जाचे वृद्धाश्रम सुरू होणे, हे गरजेचे आहे.
वानप्रस्थ सेवा संघाच्या वतीने भिवंडीतील अनगावनजीक १३ एकर परिसरात गोशाळा, बालकाश्रम व वानप्रस्थी आश्रम उभारला आहे. रा.स्व. संघाचे स्वयंसेवक असलेल्या नाना क्षीरसागर यांनी २००८ मध्ये या वृद्धाश्रमाची उभारणी केली. ८९ वर्षांचे नाना आजही या आश्रमातील बारीकसारीक बाबींकडे आवर्जून लक्ष देतात. त्यामुळे हा वानप्रस्थी आश्रम वृद्धाश्रमाबाबतचे गैरसमज पूर्णपणे बदलून टाकणारा आहे. येथे आल्यावर वृद्धांना व त्यांच्या नातलगांना प्रसन्न वाटले पाहिजे, असा नानांचा आग्रह आहे. तसेच वातावरण जपण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, आपला देश हा सर्वाधिक तरुणांचा देश आहे. पुढील २० ते २५ वर्षांनंतर हा सर्वाधिक वृद्धांचा देश होणार आहे, हे भविष्य नजरेआड करून चालणार नाही. त्यामुळे वृद्धाश्रमांची वाढती गरज दुर्लक्षून चालणार नाही. सध्या काही ठिकाणी एक पैसा न घेता सेवाभावी वृत्तीने चालवले जाणारे वृद्धाश्रम आहेत. ते अगदी रस्त्यावर टाकून दिलेल्या किंवा उकिरड्यावरील अन्न खाणाऱ्या वृद्धांच्या संगोपनाची जबाबदारी घेतात.
भिवंडी, डोंबिवलीत असे वृद्धाश्रम आहेत. येथील काही वृद्ध हे विदेशांत शिकलेले किंवा तेथे वास्तव्य करून भारतात परतलेले आहेत. नातलगांनी त्यांच्याकडील सर्व पैसाअडका काढून घेऊन त्यांना रस्त्यावर टाकून दिले होते. काही लोक वृद्धांना वारीला पंढरपूरला घेऊन जायचे व सोडून द्यायचे, असेही करतात. त्यांची काळजी तेथील गाडगेमहाराज किंवा तुकडोजीमहाराज आश्रमाकडून घेतली जाते. सेवाभावी वृद्धाश्रमांबरोबरच महिनाकाठी १० ते १२ हजार रुपये घेऊन चालवले जाणारे वृद्धाश्रम आहेत. मात्र, यापैकी काही वृद्धाश्रमांत वृद्धांना पुरेसे अन्न दिले जात नाही. स्वच्छता राखली जात नाही, अशा तक्रारी कानांवर येतात. अनेक वृद्धाश्रमांत वृद्धांची देखभाल करण्याकरिता पुरेसे मनुष्यबळ नाही, ही मोठी समस्या आहे.
समाजातील तरुणवर्गाने वृद्धांच्या सेवेकरिता थोडा वेळ काढला पाहिजे. वृद्धांना मानसिकदृष्ट्या विरंगुळा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या वानप्रस्थी आश्रमात आम्ही दरमहिन्याला कीर्तन, प्रवचन, व्याख्याने, शेरोशायरी, हिंदी-मराठी गीतांचे कार्यक्रम करतो. वृद्धांना आपापसांत चर्चा करण्याची संधी देतो. कधीकधी ते परस्परांशी वादविवाद करतात, भांडतात. बालकाश्रम जवळ असल्याने घरापासून दूर असले तरी नातवंडांची उणीव त्यांना भासत नाही. खरेतर, बालकाश्रम व वृद्धाश्रम हे जवळजवळ उभारणे गरजेचे आहे. आमच्याकडील ज्येष्ठ नागरिक बालकाश्रमातील मुलांचा अभ्यास घेतात, त्यांना गोष्टी सांगतात. आमच्या वानप्रस्थी आश्रमात येऊन राहण्याकरिता व तेथील व्यवस्था जवळून पाहण्याकरिता तरुणांची वास्तव्याची व्यवस्था केलेली आहे.
घरातील तरुण पिढीशी पटत नाही म्हणून वृद्धाश्रमात आणून ठेवलेल्यांची संख्या ही २० टक्के असते. उर्वरित ८० टक्के कुटुंबांत वृद्ध व्यक्तीला सांभाळायला कुणी नाही म्हणून वृद्धाश्रमात ठेवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पण, एक बदलती मानसिकता धक्कादायक आहे. काही घरांमध्ये मुलांच्या लग्नाचे पाहायला सुरुवात केल्यावर चालून येणाºया मुलींच्या स्थळांकडून घरातील आजी-आजोबांचे काय करणार? ते घरीच राहणार का? अशी विचारणा केली जाते. आजी-आजोबा घरीच राहणार असतील तर मुली त्या मुलांचे स्थळ नाकारतात. त्यामुळे केवळ मुलांची लग्ने व्हावी, याकरिता वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवायला लागल्याची काही उदाहरणे आहेत.
(लेखक वानप्रस्थी आश्रमाचे व्यवस्थापक आहेत)
सध्या ३५ ते ५० वयोगटांतील पिढीचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. घरातील वृद्ध व्यक्तीला वृद्धाश्रमात ठेवतोय म्हणजे काहीतरी पाप करतोय, अशी भावना अनेकांच्या मनात असते. लोक काय म्हणतील, त्याचा विचार करणे चुकीचे आहे. त्याचबरोबर आज तरुण असलेल्यांनाही वृद्ध झाल्यावर या प्रश्नाला सामोरे जायचे आहे, याची जाणीव करून देण्याची गरज आहे. स्वच्छ, टापटीप व वक्तशीर वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे.
- जयंत गोगटे