डोंबिवली : मिठाईतून गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून उत्तरप्रदेशला फरार झालेला नराधम संदीप कुमार (वय ३२) याला तेथील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नोव्हेंबर महिन्यात मुलीवर तिच्या राहत्या घरात अत्याचार करून तो फरार झाला होता. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून नराधम पोलिसांना गुंगारा देत होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा
पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी संदीप हे उत्तर प्रदेश राज्यातील रहिवाशी असल्याने दोघेही एकमेकांना ओळखतात. पीडित मुलगी डोंबिवली पूर्वेतील एका वस्तीत कुटूंबासह राहून भंगार गोळा करण्याचे काम करते. तर संदीप हा देखील भांगर गोळा करण्याचा व्यवसाय करून तो पीडित मुलीच्या घरीच राहात होता.
जानेवारी २०२२ मध्ये संदीपची वाईट नजर त्या पीडित मुलीवर पडली होती. तेव्हापासून तो तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पीडित मुलगी त्याला विरोध करायची. मात्र आक्टोबर २०२४ मध्ये त्याने पीडित मुलीला मिठाई मधून गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर राहत्या घरातच लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, या घटनेनंतर पीडित मुलगी भयभीत झाली होती. आरोपी पीडितेला व तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देत मुलीवर वारंवार अत्याचार करत होता. अखेर तिने १४ डिसेंबर रोजी मानपाडा पोलीस ठाण्याच्या धाव घेऊन संदीप कुमार विरोधात तक्रार दिली.