डोंबिवलीतील कारखाने २३ आॅगस्टपर्यंत बंद
By Admin | Updated: July 30, 2016 04:48 IST2016-07-30T04:48:27+5:302016-07-30T04:48:27+5:30
रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया होत नसल्याच्या कारणावरून गेला महिनाभर बंद असलेले डोंबिवली आणि अंबरनाथमधील कारखाने २३ आॅगस्टपर्यंत बंदच राहणार

डोंबिवलीतील कारखाने २३ आॅगस्टपर्यंत बंद
डोंबिवली : रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया होत नसल्याच्या कारणावरून गेला महिनाभर बंद असलेले डोंबिवली आणि अंबरनाथमधील कारखाने २३ आॅगस्टपर्यंत बंदच राहणार आहेत. प्रक्रियेसाठी टँकरद्वारे सांडपाणी आणण्याचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादापुढे मार्गी न निघाल्याने ही बंदी कायम राहिली आहे. त्यामुळे दीड हजार कोटींचे नुकसान होईल, असा कारखानदारांचा दावा आहे.
सांडपाण्यावरील प्रक्रियेबाबत समाधानकारक प्रतिज्ञापत्र सादर करता न आल्याने लवादाने पर्यावरण खात्याच्या केंद्रीय सचिवांना फटकारले आणि सुधारित पत्र सादर करण्याचे आदेश दिले.
निकषांची पूर्तता न करता सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवले जात असल्याबद्दल २ जुलैपासून डोंबिवलीतील ८६ आणि अंबरनाथमधील ५६ कारखाने बंद करण्याची कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागीय कार्यालयाने केली होती. तसेच अंबरनाथ व डोंंबिवली फेज-२ मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याला कारखानदारांनी लवादापुढे आव्हान दिले होते. या स्थगिती अर्जाच्या याचिकेवर २३ आॅगस्टला सुनावणी होणारआहे.
कारखानदार आणि डोंबिवली एमआयडीसीच्या फेज-२मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या संचालक मंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. लवादाचा निर्णय होईपर्यंत कारखान्यातील रासायनिक सांडपाणी टँकरद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर प्रक्रिया करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.
प्रादेशिक अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तोंडी मान्यता दिली आहे. मात्र, टँकरद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेण्यास लेखी मान्यता अद्याप मिळाली नाही. दरम्यान, समाधानकारक प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने पर्यावरण व वन खात्याच्या केंद्रीय सचिवांना लवादाने चांगलेच फटकारले. (प्रतिनिधी)
प्रतिज्ञापत्रातील माहिती दिशाभूल करणारी
- सध्याच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती मोघम असल्याचे लवादाचे म्हणणे आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या पहिल्या पेजमधील प्रक्रिया केंद्राची प्रक्रिया क्षमता १६ दशलक्ष लीटर असतानाही तेथे फक्त ११ दशलक्ष लीटर सांडपाणी येते.
त्यामुळे सर्व निकषांची पूर्तता सहज शक्य असल्याचा दावा त्या प्रतिज्ञापत्रात होता. मात्र, त्या दाव्याला ‘वनशक्ती’ पर्यावरणने आक्षेप घेतला.
ज्या काळातील हा दावा आहे, त्या काळात पाणीकपात लागू असल्याने कारखान्यांतून येणारे सांडपाणी कमी झाल्याचे म्हणणे त्यांनी मांडले आणि प्रतिज्ञापत्रातील माहिती दिशाभूल करणारी असल्याचा दावा केला.
प्रक्रिया केलेल्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण वाढल्याबाबत प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसल्याकडे त्यांनी लक्षवेधले. त्यामुळे संबंधित खात्याला नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश लवादाने दिला.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ आॅगस्टला होेणार आहे.