Dombivali: शिंदे गटातील मोठा नेता आयुक्तांवर आणतोय दबाव, मनसे आमदाराचे खळबळजनक ट्विट
By प्रशांत माने | Updated: April 7, 2023 17:55 IST2023-04-07T17:54:51+5:302023-04-07T17:55:40+5:30
Dombivali: कामाचे श्रेय मनसे आमदाराला मिळू नये यासाठी शिंदे गटातील एक मोठा नेता लोकप्रतिनिधी आयुक्तांवर दबाव आणतोय असा खळबळजनक आरोप आमदार पाटील यांनी ट्विटद्वारे केला आहे.

Dombivali: शिंदे गटातील मोठा नेता आयुक्तांवर आणतोय दबाव, मनसे आमदाराचे खळबळजनक ट्विट
- प्रशांत माने
डोंबिवली - कल्याण ग्रामीण परिसरातील पलावा सिटीला आयटीपी प्रकल्पांतर्गत मालमत्ताधारकांना मालमत्ता करात ६६ टक्क्यांची सूट मिळावी यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील केडीएमसीकडे पाठपुरावा करीत आहेत. या कामाचे श्रेय मनसे आमदाराला मिळू नये यासाठी शिंदे गटातील एक मोठा नेता लोकप्रतिनिधी आयुक्तांवर दबाव आणतोय असा खळबळजनक आरोप आमदार पाटील यांनी ट्विटद्वारे केला आहे. त्यांच्या ट्विट मुळे आयुक्तांवर दबाव आणणारा लोकप्रतिनिधी कोण? या चर्चेला उधाण आले आहे.
नशीबाने तुम्हाला हत्ती दिले आहेत तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करु नका. लोकहिताच्या निर्णयाला समर्थन दया. कदाचित हीच पुण्याई भविष्यात तुम्हाला कामाला येईल असा सल्ला ही पाटील यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
पलावा सिटी अंतर्गत येणाऱ्या २५ हजार फ्लॅट धारकांना मनपाने मालमत्ता कर न भरल्यामुळे नोटीसा पाठविल्या होत्या. आमदार पाटील यांनी बॅनर लावून मनपाच्या निर्णयाचा विरोध केला होता. मालमत्ता करात सूट मिळावी यासाठी पाटील गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. प्रशासनाने प्रतिसाद दिला पण अंमलबजावणी केली नाही. यावर पाटील यांनी चौकशी करता ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात त्याचे श्रेय तुम्हाला मिळू नये म्हणून शिंदे गटातील मोठा लोकप्रतिनिधी आयुक्तांवर दबाव आणत असल्याचे काही पालिका अधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर निदर्शनास आणून दिल्याकडेही ट्विटद्वारे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.