Doctors refuse to give death body before pay bills | बिल न दिल्याने मृतदेह देण्यास डॉक्टरांचा नकार

बिल न दिल्याने मृतदेह देण्यास डॉक्टरांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीमध्ये असलेल्या विजय केअर सेंटरमध्ये बिल न दिल्याने एका महिलेचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. ही बाब मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णालयात गोंधळ घालत तो मृतदेह स्वतः उचलून त्यावर अंत्यसंस्कार केले.


अंबरनाथमध्ये एमआयडीसी भागात विजय कोविड केअर सेंटर असून या सेंटरमध्ये बदलापूरच्या रहिवासी असलेल्या मीरा बनकर या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून ही महिला मृत्यूशी झुंज देत होती. अखेर रविवारी सकाळी साडेसात वाजता त्यांचा मृत्यू झाला. याची कल्पना मृत महिलेच्या मुलांना देण्यात आली. मृत महिलेची मुलगी आणि मुलगा या दोघांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात गेले असता जोपर्यंत बिल भरत नाही तोपर्यंत मृतदेह न देण्याचा निर्णय तेथील डॉक्टरांनी घेतला. अखेर या प्रकरणी कोणताही तोडगा निघत नसल्याने ही दोन्ही मुले डॉक्टरांच्या भूमिकेमुळे स्तब्ध झाली होती.


या प्रकरणाची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच मनसेचे जिल्हा उपसंघटक शैलेश शिर्के यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धाव घेत रुग्णालय प्रशासनाला मृतदेह देण्यास सांगितले, मात्र रुग्णालय प्रशासनाने अरेरावीची भाषा करीत मृतदेह न देण्याचा अट्टाहास कायम ठेवला. त्यावरून रुग्णालयातील कर्मचारी आणि मनसे पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाले आणि त्यानंतर धक्काबुक्की झाली. या वेळेस चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली. 

प्रशासनाने नमते घेतले 
हा सर्व प्रकार झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने नमते घेत मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. मात्र रुग्णालयातील कोणत्याच कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला हात न लावल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मृतदेह उचलून शववाहिनीत ठेवला. एवढेच नव्हे तर बदलापूरच्या स्मशानभूमीत त्या महिलेवर अंत्यसंस्कारही केले.

Web Title: Doctors refuse to give death body before pay bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.