डॉक्टरांची हलगर्जी, नवजाताचा मृत्यू; सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकारामुळे संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 08:57 IST2025-10-28T08:57:31+5:302025-10-28T08:57:46+5:30
डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.

डॉक्टरांची हलगर्जी, नवजाताचा मृत्यू; सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकारामुळे संताप
सफाळे : पालघर तालुक्यातील सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूरपाडा (कपासे) येथील गर्भवती राजश्री सचिन पडवले यांना रविवारी रात्री आठच्या सुमारास सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. रात्रभर त्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी ठेवण्यात आले. सोमवारी पहाटेच्या सुमारास प्रसूतीची चिन्हे दिसू लागल्यावर नातेवाइकांनी डॉक्टरांना बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी डॉक्टर व नर्स विश्रांतीसाठी कक्षात असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यांनी दरवाजा ठोठावून त्यांना उठवले.
तपासणीदरम्यान बालकाने गर्भात मलविसर्जन केल्याचे लक्षात आले. त्यामुळे गर्भवीतीला उपचारासाठी पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर महिलेचे पती सचिन पडवले यांनी पत्नीला खासगी रुग्णालयात नेले, मात्र तेथे दाखल करताच नवजात बालकाला मृत घोषित करण्यात आले.
मृतदेहासह नातेवाइकांचा आरोग्य केंद्रात आक्रोश
या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी मृत बाळाला आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कक्षात ठेवून जोरदार आक्रोश व्यक्त केला. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. घटनास्थळी सफाळे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्ता शेळके यांनी तत्काळ धाव घेत मध्यस्थी केली. त्यांनी नातेवाइकांना शांत केले आणि तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर बाळाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर कपासे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरोग्य केंद्रात जमा झाले होते. स्थानिकांनी आरोग्य विभागाकडे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रात्री माझा रक्तदाब वाढल्याने गोळी देण्यात आली होती. मात्र, दुसरे कुठलेही औषधे दिले नाही. सकाळच्या सुमारास तपासले असता बाळाने शी केली आहे. पुढील दवाखान्यात हलवण्यासाठी येथील वैद्यकीय अधिकारी व नर्स यांनी सांगितले- राजश्री पडवले, बाळंतीण महिला
रविवारी रात्री प्रसूतीसाठी आलेल्या दोन महिलांपैकी एकी सिझर करून प्रसूती केली. नंतर तिला मनोर येथे हलवले. त्याच दरम्यान कपासे येथील राजश्री पडवले या महिलेची प्रसूती सुखरूप होणार होती. मात्र सकाळी बाळाने शी केल्यामुळे ठोके कमी झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्या महिलेला सल्ला देण्यात आला-स्वरुपा भादवे, वैद्यकीय अधिकारी, सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र