सावरकर गौरव यात्रेतून उल्हासनगरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा काढता पाय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 19:08 IST2023-04-05T19:06:39+5:302023-04-05T19:08:28+5:30
उल्हासनगर भाजप व शिवसेना शिंदे गटाने पक्ष आदेशानुसार मंगळवारी दुपारी ४ वाजता कॅम्प नं-५ वाजता झुलेलाल प्रवेशद्वार येथून वीर सावरकर गौरव यात्रेला सुरुवात झाली.

सावरकर गौरव यात्रेतून उल्हासनगरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा काढता पाय?
सदानंद नाईक
उल्हासनगर : भाजप-शिवसेना शिंदे गटाने मंगळवारी रोजी काढलेल्या स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोप कार्यक्रमातून शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी काढता पाय घेतल्याने, शहरात वेगळ्याच चर्चेला ऊत आला. याबाबत उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी समारोप ठिकाणी पोहचताच अयोध्या येथील कार्यक्रमासाठी गेल्याचे सांगितले.
उल्हासनगर भाजप व शिवसेना शिंदे गटाने पक्ष आदेशानुसार मंगळवारी दुपारी ४ वाजता कॅम्प नं-५ वाजता झुलेलाल प्रवेशद्वार येथून वीर सावरकर गौरव यात्रेला सुरवात झाली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, दिपक छतवानी, शिवसेना शिंदे गटाचे अरुण अशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड आदी शेकडो पदाधिकार्यांनी सहभाग नोंदविला. संत झुलेलाल प्रवेशद्वार पासून निघालेली यात्रा कॅम्प नं-५ मार्केट, नेताजी चौक, व्हीनस चौक मार्गे लालचक्की, फॉरवर्ड लाईन, नेहरू चौक, शिरू चौक मार्गे जुना बस स्टॉप मार्गे बिल्ला गेट ते बिर्ला गेट पर्यंत शिस्तबद्ध होती. बिर्ला गेट येथे सभेचे समारोप होऊन आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी मार्गदर्शन केले. कॅम्प नं-५ बिर्ला गेट नीलकंठ महादेव मंदिर येथे वीर सावरकर गौरव यात्रेचा समारोप झाला.
यावेळी भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी यात्रेत सामील झालेल्या नागरिकांचे स्वागत केले. तसेच यात्रेमुळे नागरिकांना त्रास झाल्यास क्षमा असावी असे पुरस्वानी म्हणाले. दरम्यान यात्रेत सहभागी झालेले शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत कुठे? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर, त्यांची तारांबळ उडाली. यात्रेतून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी काढता पाय घेतल्याने, दोन्ही पक्षात धुसमुस सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान याना संपर्क साधला असता त्यांनी गौरव यात्रेत सहभागी झाल्याचे सांगून समारोप ठिकाणाहून अयोध्या येथे साहित्य पाठवायचे असल्याने, पदाधिकारी गेले असावे, असे सांगितले. दोन्ही पक्षात समन्वय असून गौरव यात्रेत दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याचे सांगितले.