संघावरील टीकेकडे लक्ष देऊ नका
By Admin | Updated: October 12, 2016 04:31 IST2016-10-12T04:31:45+5:302016-10-12T04:31:45+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची अनुभूती घ्यावी. परकीयांनी आक्रमण करू नये, यासाठी प्रभावी हिंदू संघटना आवश्यक आहे. प्रसिद्धी माध्यमांमध्ये होणाऱ्या टीकेकडे लक्ष न देता नागरिकांनी

संघावरील टीकेकडे लक्ष देऊ नका
डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची अनुभूती घ्यावी. परकीयांनी आक्रमण करू नये, यासाठी प्रभावी हिंदू संघटना आवश्यक आहे. प्रसिद्धी माध्यमांमध्ये होणाऱ्या टीकेकडे लक्ष न देता नागरिकांनी संघाच्या कार्यात डोळसपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संघाच्या कोकण प्रांताचे बौद्धिक प्रमुख उदय शेवडे यांनी केले.
डोंबिवलीत विजयादशमीनिमित्त मंगळवारी संघाचे संचलन व उत्सव झाला. त्यावेळी ते बोलत होते. खरे तर विजयादशमीचा उत्सव देशभर २८ सप्टेंबरपासूनच सुरु झाल्याचे सांगत त्यांनी नकळत सर्जिकल हल्याची आठवण करुन दिली. संघाने गणवेशात बदल केल्यामुळे त्याची सध्या चर्चा होत आहे असे त्यांनी सांगितले. स्वयंसेवकांना भगवा ध्वज हा गुरुस्थानी असून समाजाला अनुसरूनच परिवर्तन केले जाते. संघाच्या परिवारात अनेक सामाजिक संघटना निर्माण झाल्या. त्या त्या परिस्थितीनुसार बदल झाल्याचे सांगून आजमितीस ४० संघटना प्रमुख भूमिका घेत कार्यरत आहेत असे त्यांनी नमूद केले.
सामाजिक संघटन, समरसता हे महत्त्वाचे मानत सेवा विभाग सुरु झाला. आज सुमारे एक लाख सेवा कार्यकर्ते कार्यरत आहे. दैनंदिन शाखा तसेच २०१० पासून जनजागरण श्रेणी अशा दोन भागांमध्ये संघाचे कार्य अधिक जोमाने सुरु झाले, असे त्यांनी सांगितले. पूर्वांचलमधील समस्या सोडविण्याचा विडा संघाने उचलला. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे शेवडे यांनी सांगितले. त्यामुळे विविध स्तरांवर संघाचे कार्य अव्याहतपणे सुरु असून त्यात समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.