जिल्हा नियोजन कार्यालय 1 एप्रिलपासून होणार पेपरलेस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 03:48 PM2019-12-04T15:48:34+5:302019-12-04T15:59:03+5:30

जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज आय-पास संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

The District Planning Office will be paperless from April 1 | जिल्हा नियोजन कार्यालय 1 एप्रिलपासून होणार पेपरलेस

जिल्हा नियोजन कार्यालय 1 एप्रिलपासून होणार पेपरलेस

Next

ठाणे : जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज आय-पास संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिल २०२०पासून नियोजन विभागाचे कामकाज पेपरलेस होणार आहे. नियोजन विभागाशी संबंधित सर्व कामे एका क्लिकवर होणार असल्याने सर्व विभागांना या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरी सर्व विभागांनी 1 जानेवारीपासून सर्व प्रस्ताव ऑनलाइन सादर करावे, अशा सूचना उपायुक्त बापूसाहेब सबनीस यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता एकदिवसीय आय-पास प्रणाली प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना सबनीस यांनी सूचना दिल्या. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे उपस्थित होते. नियोजन विभागातील कामकाज पेपरलेस करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी इंटिग्रेटेड प्लानिंग ऑफिस ऑटोमेशन(आय-पास)प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

आय- पास ही संगणकीय यंत्रणा राज्यभर कार्यान्वित केली जाणार आहे. नियोजन विभागातील टपालांचे व्यवस्थापन, कामांचे संनियंत्रण, कामाचे भौगोलिक स्थान, कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंतची अद्ययावत स्थिती, निधीचे व्यवस्थापन, विविध स्तरांवरील डॅशबोर्ड ही सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना ,आमदार निधी, खासदार निधी,डोंगरी विकास कार्यक्रम या सारख्या विविध योजनांच्या कामांना मान्यता,निधी वितरण, सर्वंकष मॉनेटरींग, जी.पी.एस.लोकेशन टॅगिंग, कामाची प्रगती तपासणे इत्यादी विविध बाबींचा समावेश आहे. तसेच संबंधित विभागाच्या अधिका-यांना आपल्या प्रस्तावाची सद्यस्थिती, निधी, प्रस्ताव पास झाला किंवा नाही हे एका क्लिकवर दिसणार आहे.

जनतेसाठी प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामकाज संगणकीकृत होऊन सुलभ, लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती स्तरावर सहायक जिल्हा नियोजन अधिकारी निवेदिता पाटील यांच्या अधिपत्याखाली सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून सदर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. सर्व विभाग प्रमुख आणि अधिनस्त कर्मचारी यांना युझर नेम व पासवर्ड तसेच हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे पूर्णत: संगणकीकरण करून कार्यालयातील कामकाज कागदविरहित (पेपरलेस) करण्याचे काम नाशिक येथील ईएसडीएस लि. या कंपनीकडे सोपविण्यात आले असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी सांगितले. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The District Planning Office will be paperless from April 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.