जिल्ह्याला मिळाल्या ‘कोव्हीशिल्ड’च्या ६० हजार लसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:00+5:302021-04-30T04:51:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. परंतु, अपुऱ्या लसींमुळे या ...

जिल्ह्याला मिळाल्या ‘कोव्हीशिल्ड’च्या ६० हजार लसी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. परंतु, अपुऱ्या लसींमुळे या मोहिमेला ब्रेक लागत आहे. त्यात बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालय, महापलिका क्षेत्रात लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. सायंकाळपर्यंत लसींचा साठा उपलब्ध न झाल्यामुळे गुरुवारीही लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली होती. मात्र, गुरुवारी सकाळी जिल्ह्यासाठी ६० हजार कोव्हीशिल्डच्या लसींचा साठा उपलब्ध झाल्याने पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. दरम्यान, हा साठा किती दिवस पुरेल, याबाबत साशंकता आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या व वाढते मृत्यू चिंता वाढविणारे आहेत. दुसरीकडे, लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरणाची गती मंदावत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिका प्रशासनाने विकेंड लॉकडाऊनचे कारण पुढे करीत दोन दिवस लसीकरण बंद ठेवले होते. मागील आठवडाभर लसी कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्याला उपलब्ध होत होत्या. लसीअभावी मागील रविवारी ठाणे शहर व जिल्ह्याच्या इतर भागांत लसीकरण बंद होते. पुन्हा बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे महापालिका हद्दीतील लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली होती. अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे जिल्ह्यात लसीकरण राबवायचे कसे असा, प्रश्न आरोग्य प्रशासनापुढे आहे.
ठाणे महापालिका प्रशासनाने लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू केले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार रविवारी (दि. २५) सायंकाळी जिल्ह्याला लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर सोमवारी महापालिकेने ३७ केंद्रांवर लसीकरण सुरू केले. परंतु, पुन्हा बुधवारी (दि. २८) लसींचा साठा संपल्याने लसीकरण बंद ठेवण्याची वेळ ओढवली.
दरम्यान, गुरुवारी सकाळी जिल्ह्यासाठी ‘कोव्हीशिल्ड’चा ६० हजारांचा साठा उपलब्ध झाला. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण क्षेत्राला हा साठा देण्यात आला. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात पुन्हा लसीकरण सुरू झाले. तर, ठाणे महापालिका हद्दीत ३१ केंद्रांवर नागरिकांना लस देण्यात आली.
शहरानिहाय ‘कोव्हीशिल्ड’चा साठा
ठाणे - ११,०००
कल्याण-डोंबिवली - १०,०००
मीरा-भाईंदर - १२,०००
नवी मुंबई - १२,५००
ठाणे ग्रामीण - १०,०००
उल्हासनगर - २,५००
भिवंडी - २,०००
एकूण - ६०,०००