दुर्गम आदिवासी पाड्यात कल्याणच्या सामाजिक संस्थांचं कपडे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 15:05 IST2018-01-29T15:04:20+5:302018-01-29T15:05:36+5:30

दुर्गम आदिवासी पाड्यात कल्याणच्या सामाजिक संस्थांचं कपडे वाटप
कल्याण- कल्याण परिसरात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन काम करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन या संस्थेने नुकतेच शहापूर तालुक्यातील विहिगाव माळ आणि दापुरमाळ या अतिशय दुर्गम आदिवासी पाड्यात कपडे वाटण्याची मोहीम राबवली. आपल्याकडील जुने कपडे देण्याचे आवाहन कल्याणकर नागरिकांना करण्यात आले होते आणि या मोहिमेसाठी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. पहिल्या टप्यात वांगणीजवळील बेडीसगाव परिसरात कपडे वाटप आणि ग्रंथालयाची सुरुवात करण्यात आली होती आणि मोहिमेच्या या दुसऱ्या टप्यात मोठ्या प्रमाणात कपडे वाटपाची मोहीम घेण्यात आली. या मोहिमेला शहापूर परिसरात काम करणाऱ्या दि वात्सल्य फाउंडेशनने मोठे सहकार्य केले त्याचबरोबर अंघोळीची गोळी टीम मुंबई, साद फाउंडेशन अंबरनाथ, टीम परिवर्तन कल्याण, गावं तिथे ग्रंथालय महाराष्ट्र या संस्थांच्या सदस्यांनी या संपुर्ण मोहिमेचे यशस्वी नियोजन करण्यासाठी हातभार लावला. आजही अनेक दुर्गम आदिवासी पाडे चांगले रस्ते आणि विजेच्या सोयीमुळे दुर्लक्षित राहिले आहेत त्यांना किमान मुलभूत गरजा मिळवून देण्यासाठी आम्ही विविध क्षेत्रांत काम करणारे युवक एकत्र येवुन ही मोहीम पार पाडत आहोत असे यावेळीं इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशनचे महेश बनकर यांनी सांगितले. अनेक सोयीपासून वंचित असणाऱ्या दापुरमाळला जाण्यासाठी किमान दोन तासांची पायपीट करावी लागते. आमच्या सोबत आलेल्या तरुण मंडळीने तेथे जावुन कपडे वाटप केले आणि बऱ्याच समस्या जाणुन घेण्याचा प्रयत्न देखील यावेळीं केला यापुढें देखील ही मोहीम अशीच चालू राहणार आहे.