शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात वादावादी; शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 07:19 IST2025-01-30T07:19:06+5:302025-01-30T07:19:50+5:30

वाद भडकू नये, म्हणून शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Dispute between Shinde Sena and Uddhav Sena over taking over the branch | शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात वादावादी; शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात

शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात वादावादी; शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : येथील पूनम गार्डनची शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात वादावादी झाली. शिवसेना फुटली तेव्हापासून शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाला नव्हता. मात्र, शाखेतील काही जण शिंदेसेनेत गेल्यानंतर दोन्ही गट भिडले. अखेर पोलिसांनी शाखेला दोन्ही गटांना त्यांचे टाळे मारण्यास सांगितले. वाद भडकू नये, म्हणून शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर अन्यत्र शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाले. मात्र, मीरा-भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे शाखांवरून शिवसैनिकांमध्ये वाद घडले नाहीत. सरनाईक यांनी कंटेनर शाखांच्या माध्यमातून शिंदेसेनेच्या शाखा थाटल्या. त्या शाखांना सुरुवातीला भाजप, उद्धवसेना, मनसे, काँग्रेस आदींनी विरोध केला. त्यामुळे मध्यंतरी पालिकेने कंटेनर शाखांवर कारवाई केली. मात्र, राजकीय पक्षांचा विरोध मावळल्यानंतर कंटेनर शाखा पुन्हा सुरू झाल्या. पूनम गार्डन येथील शिवसेनेची शाखा ठाकरे गटाच्या ताब्यातच होती. मात्र, शाखेतील पदाधिकारी आणि माजी परिवहन समिती सदस्य शिवशंकर तिवारी यांनी ठाणे येथे शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर तिवारींसह शिंदेसेनेच्या शिवसैनिकांनी ही शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सोमवारी रात्री केला. त्याला विरोध करीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शाखेत ठिय्या मारला.

वाद टाळण्याचा प्रयत्न
शिंदेसेनेकडून तिवारींसह रामभवन शर्मा, शिवा सिंह तसेच महिला व पुरुष शिवसैनिक जमले. उद्धवसेनेकडून जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी गटनेत्या नीलम ढवण, प्राची पाटील व अन्य पदाधिकारी-शिवसैनिक जमले.  दोन्ही बाजूंनी बोलाचाली व रेटारेटी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना बाजूला केले, तर दोन्ही गटांचे प्रमुख पदाधिकारी मात्र आपसात सामंजस्याने बोलून वाद टाळण्याचा प्रयत्न करीत होते.

Web Title: Dispute between Shinde Sena and Uddhav Sena over taking over the branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.