थकबाकीदांराचा वीजपुरवठा खंडित करा; अंकुश नाळे यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 17:15 IST2020-02-28T17:15:10+5:302020-02-28T17:15:19+5:30
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात दरमहा दिले जाणारे वीजबिल वसुलीचे निर्धारीत उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात लक्षणीय फरक राहत आहे.

थकबाकीदांराचा वीजपुरवठा खंडित करा; अंकुश नाळे यांचे निर्देश
डोंबिवली: महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात दरमहा दिले जाणारे वीजबिल वसुलीचे निर्धारीत उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात लक्षणीय फरक राहत आहे. परिणामी आर्थिक वर्षाच्या शेवटी थकबाकीच्या रकमेत होणारी वाढ महावितणच्या एकूण आर्थिक परिस्थितीला मारक ठरेल. त्यामुळे दरमहाच्या वसुलीचे लक्ष्य त्याच महिन्यात शंभर टक्के पुर्ण करण्यासोबतच थकबाकीदारांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करा, असे स्पष्ट निर्देश कोकण विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्रभारी प्रादेशिक संचालक नाळे यांनी कोकण विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता, सर्व अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले.
महावितरणच्या एकूण महसुलात जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देणाऱ्या कोकण विभागाच्या वसुलीत दरमहा राहणारी तफावत महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारा आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून थकबाकी वसुली मोहिमेला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करावे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे निर्देश त्यांनी दिले
कोकण प्रादेशिक विभागातून फेब्रुवारी-२०२० या महिन्यात वीजबिलाचे २३१७.४७ कोटी रुपये वसूल होणे आवश्यक आहे. मात्र २७ फेब्रुवारीपर्यंत यातील २०५७.८३ कोटी रुपयेच वसूल होऊ शकले. याशिवाय एप्रिल २०१९ पासूनचे ३७० कोटी आणि चालू विजबिलाची उर्वरित रक्कम वसूल होणे अद्याप बाकी आहे. वसुली मोहिमेला गती देऊन ही रक्कम वसूल करण्याचे निर्देश नाळे यांनी दिले आहेत.
तसेच मुख्य कार्यालयाकडून दरमहा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत देण्यात येणाऱ्या यादीतील ग्राहकांची वीज दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत खंडित करण्याचे आदेश त्यांनी दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेऊन या कारवाया नियमानुसार व वेळेत पूर्ण करण्यासोबत पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या बैठकीला मुख्य अभियंते सर्वश्री दिनेश अग्रवाल, ब्रिजपालसिंह जनवीर, दीपक कुमठेकर, श्रीमती पुष्पा चव्हाण व रंजना पगारे यांच्यासह कोकण प्रादेशिक विभागातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
सहकार्य करून संभाव्य गैरसोय टाळा
थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पुन:र्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पुर्ववत केला जात नाही. त्यामुळे कोकण प्रादेशिक विभागातील ग्राहकांना थकबाकी व चालू वीजबिल भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन नाळे यांनी केले आहे.