लसीकरण लांबल्यामुळे जिल्ह्यातील ४३.६३ लाख तरुणांची निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:06+5:302021-04-30T04:51:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखून त्यावर मात करण्यासाठी १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांना कोरोना प्रतिबंधात्मक ...

लसीकरण लांबल्यामुळे जिल्ह्यातील ४३.६३ लाख तरुणांची निराशा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखून त्यावर मात करण्यासाठी १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार होती. पण, लसतुटवड्याअभावी काही दिवसांसाठी हा मुहूर्त टाळण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील १८ ते ४४ या वयोगटातील तब्बल ४३ लाख ६३ हजार ९८ तरुणांची मात्र निराशा झाली आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा कहर वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढायला लागली. त्यापासून बचाव करण्यासह कोरोनामुक्त राहण्यासाठी सध्याची कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे हा एकमेव उपाय आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून राज्य शासनाने १ मे या ‘महाराष्ट्र दिनी’ १८ वर्षांवरील युवा, युवतींचे लसीकरण करण्याचा मुहूर्त निश्चित केला होता. मात्र, ही प्रतिबंधात्मक लस मुबलक प्रमाणात सध्या उपलब्ध नसल्याने हा लसीकरणाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. यामुळे जिल्ह्यातील नवतरुण, तरुणींच्या लसीकरणाचे वेळापत्रक आता काही दिवसांसाठी तरी कोलमडले आहे.
या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी वापरण्यात येत आहेत. या लसींपैकी जिल्ह्यात प्रारंभापासून आतापर्यंत सर्वाधिक कोविशिल्डला १० लाख ५२ हजार ७१८ जणांनी पसंती दिली आहे. कोविशिल्डच्या या पसंतीखालोखाल कोव्हॅक्सिनचे अवघ्या १ लाख २ हजार ६८४ जणांना डोस देण्यात आले आहेत. आजपर्यंत झालेल्या ११ लाख ५५ हजार ४०२ लसीकरणापाठोपाठ जिल्ह्यातील ४३ लाख ६३ लाख ९८ जणांच्या लसीकरणास शनिवारपासून प्रारंभ होणार होता. तो आता काही दिवस लांबला आहे.
लसीकरण लांबणीवर पडलेल्यांमध्ये जिल्ह्यातील १८ वर्षे पूर्ण झालेल्यांमध्ये ६९ हजार २०७ तरुणांसह २९ वर्षांच्या १० लाख १६ हजार ८२४ जणांचा समावेश आहे. या १० लाख ८६ हजार तरुणांसह ३९ वर्षांच्या १५ लाख ९२ हजार ३६ तरुणांसह ४४ वर्षापर्यंतच्या १६ लाख ८५ हजार ३१ जणांचे लसीकरण आता लांबणीवर पडलेले आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्यांना आता प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याशिवाय पर्याय नाही.
------------