‘त्या’ रस्ता रुंदीकरणातून केडीएमसीने साधले काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:40 IST2017-08-01T02:40:08+5:302017-08-01T02:40:08+5:30
केडीएमसीने कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाºया पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यात नागरिकांना चालणेही जिकिरीचे होऊन बसल्याने

‘त्या’ रस्ता रुंदीकरणातून केडीएमसीने साधले काय?
प्रशांत माने ।
कल्याण : केडीएमसीने कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाºया पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यात नागरिकांना चालणेही जिकिरीचे होऊन बसल्याने हा रुंदीकरणाचा घाट घातला आणि तो यशस्वीही झाला. परंतु, या रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. तसेच रस्त्यातील दुभाजकामुळे रस्ता पुन्हा अरुंद झाल्याने रुंदीकरणाने काय साधले, असा सवाल उपस्थित होत आहे.
रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत केडीएमसी प्रशासनाने पहिल्या टप्प्यात १६ रस्त्यांची कामे हाती घेतली होती. यात आतापर्यंत केवळ कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लागले. मात्र, त्याचा फटका व्यापाºयांना बसला खरा, पण पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली त्यांनी वाढीव बांधकामे केली आहेत. विशेष म्हणजे, ज्या इमारतींचा वापर निवासाकरिता होत होता, तो रस्ता रुंदीकरणानंतर व्यावसायिक कामांसाठी होऊ लागला आहे. महापालिकेच्या कृपाशीर्वादामुळे या रुंदीकरणात व्यापाºयांचे चांगभलं झाल्याचेही पाहावयास मिळाले. रस्ता रुंद करताना येथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती. परंतु, रुंदीकरणानंतरची परिस्थिती पाहता फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. त्यात या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांचे बस्तान आणि मधोमध असलेल्या दुभाजकाने रस्त्याची बहुतांश बाजू व्यापल्याने या रस्तारुंदीकरणाचे फलित शून्य असल्याचे पाहावयास मिळत आहे.
डोंबिवलीतील केळकर रोड आणि दीनदयाळ पथचेही रुंदीकरण महापालिकेकडून केले जाणार होते. परंतु, यासंदर्भात रहिवासी आणि व्यापाºयांना बजावलेल्या नोटिसाच चुकीच्या असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने मांडला आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू होण्यास तूर्तास विलंब लागणार आहे.
दरम्यान, कल्याणमधील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रुंदीकरण झालेल्या मार्गावरची अतिक्रमणाची स्थिती पाहता अन्य रस्त्यांच्या रुंदीकरणानंतरही तेथे अतिक्रमणाचे चित्र कायम राहण्याची दाट शक्यता आहे.