मीरा भाईंदरमध्ये धुळवड - होळी उत्साहात साजरी
By धीरज परब | Updated: March 25, 2024 18:54 IST2024-03-25T18:54:39+5:302024-03-25T18:54:52+5:30
दुपारी धुळवड खेळून रंगल्यानंतर उत्तन व गोराई समुद्र किनारी जाणाऱ्यांची गर्दी होती. गावा गावात पुरुषांनी प्रथे प्रमाणे घरोघरी फिरून नाचत - वाजत गाजत धुळवड साजरी केली.

मीरा भाईंदरमध्ये धुळवड - होळी उत्साहात साजरी
मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील विविध प्रांत व समाजांनी त्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार होळी साजरी केली. तर पूर्वी पासूनच्या असणाऱ्या गाव परिसरात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्याचा उत्साह दिसून आला. महिलांनी पारंपरिक पेहरावात रविवारी रात्री होळीचे पूजन केले.
सोमवारी धुळवड देखील उत्साहात साजरी झाली. दुपारी धुळवड खेळून रंगल्यानंतर उत्तन व गोराई समुद्र किनारी जाणाऱ्यांची गर्दी होती. गावा गावात पुरुषांनी प्रथे प्रमाणे घरोघरी फिरून नाचत - वाजत गाजत धुळवड साजरी केली. तर त्याआधी अनेक गावांमध्ये होळीच्या अनुषंगाने गावकप क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. गावच्या या स्पर्धेत केवळ गावातील लहान पासून वृद्ध सर्वचजण सहभागी झाले होते. विशेष म्हणजे विजेत्या व उपविजेत्या संघास बक्षीस म्हणून कोंबडे, बकरा दिला जातो. दरम्यान शहरात होळी व धुळवड निमित्त अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची गस्त सुरु होती . ठिकठिकाणी तपासणी केली जात होती. तर निवडणुकीच्या अनुषंगाने काही राजकीय धुळवड देखील साजरी झाली.