विकासनामा? छे आयुक्तनामा!
By Admin | Updated: February 13, 2017 05:02 IST2017-02-13T05:02:19+5:302017-02-13T05:02:19+5:30
एकीकडे शिवसेनेसोबत सत्तेत राहूनही शहराच्या विकासावरून त्या पक्षाला कोंडीत पकडणाऱ्या भाजपाने आपला विकासनामा जाहीर

विकासनामा? छे आयुक्तनामा!
ठाणे : एकीकडे शिवसेनेसोबत सत्तेत राहूनही शहराच्या विकासावरून त्या पक्षाला कोंडीत पकडणाऱ्या भाजपाने आपला विकासनामा जाहीर करताना मात्र पालिकेने केलेल्या कामांचाच समावेश करून पाठ थोपटून घेतली आहे. त्याबाबतची उत्तरे देताना पक्षाच्या नेत्यांचा प्रचंड गोंधळ उडाला आणि शिवसेनेची कोंडी करणारा पक्ष परस्परविरोधी भूमिकेमुळे स्वत:च अडचणीत आला.
शिवसेनेपाठोपाठ रविवारी भाजपाचा विकासनामा प्रकाशित झाला. त्यात ठाणे महापालिका भ्रष्टाचार, टक्केवारीमुक्त करण्याचा दावा करत शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. त्याच वेळी पालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या दोन वर्षांत ज्या कामांचा पाठपुरावा केला, जी कामे मार्गी लावली, त्यातील ७५ टक्क्यांहून अधिक कामांवर आयत्या रेघोट्या मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. शिवाय, आजवर एकत्र काम केल्यामुळे असेल, शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील काही मुद्देही भाजपाने विकासनाम्यात समाविष्ट केले आहेत.
ठाण्यातील पत्रकार परिषदेच्या वेळेस हा विकासनामा प्रकाशित करण्यात आला. आजवर २५ वर्षे शिवसेनेसोबत सत्तेत असल्याने भाजपाचा स्वतंत्र विकासनामा कधीच प्रसिद्ध झाला नव्हता. (प्रतिनिधी)
भाजपाच्या विकासनाम्यातील ठळक मुद्दे आणि वस्तुस्थिती-
पाणीपुरवठा :
२५ वर्षांत ठाणे महापालिकेला हक्काचे धरण उभारता आले नाही. त्याचा कुठेही उल्लेख करता, हे धरण राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने बांधणार. ठाणेकरांना २४ बाय ७ पाणी पुरवणार. पाणीगळती रोखण्याबरोबरच मीटरद्वारे पाणीपुरवठा करणार. पालिकेकडून यापूर्वीच मीटरसाठी टेंडर काढण्यात आले असून त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
आरोग्य :
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या विविध भागांत छोटेखानी प्रकल्प उभारण्याचे पालिकेने ठरवले असून त्याचे कामही आता मार्गी लागण्याच्या बेतात आहे. भाजपाने हाच मुद्दा आपल्या विकासनाम्यात ठळकपणे मांडला आहे. महापालिका कचरामुक्त करणार, नागरिकांसाठी जेनेरिक औषधांच्या दुकांनाना प्राधान्य देणार. कळवा रुग्णालयाचा कायापालट, भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करणार, हे अन्य मुद्दे.
शिक्षण :
शैक्षणिक भूखंडवाटपात झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करून त्यावर कारवाई करणार, उच्च शिक्षणाचे हब करणार, मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र जागतिक विद्यापीठाच्या दर्जाचे करण्यासाठी पाठपुरावा, तांत्रिक महाविद्यालयाचे जाळे निर्माण करणार, शैक्षणिक वास्तूंचा कायापालट, ठाणे १०० टक्के साक्षर करणार, महापालिका शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व डिजिटल ग्रंथालय.
परिवहन :
परिवहनसेवेचा कायापालट करताना कर्मचाऱ्यांची थकीत देणी देणार, प्रत्येक प्रवाशाला सुखकर व सुरक्षित प्रवासाची खात्री देणार, टीएमटीच्या बसेसची संख्या आणि मार्ग आवश्यकतेनुसार वाढवणार. याबाबत पालिकेची कारवाई सुरू आहे.
करप्रणाली :
गृहसंकुलांचे कॉमन वेल्फेअर हॉल करमुक्त करणार. महापालिकेचे सर्व पेमेंट चेक अथवा आरटीजीएसने करणार.
महिला व बालकल्याण :
महिलांसाठी ई-टॉयलेट, महिला बचत गटांना प्रोत्साहन, महिला व मुलांची सुरक्षितता, आरोग्य, स्वावलंबनासाठी विशेष प्रयत्न, खाजगी संस्थांना पाळणाघरासाठी प्रोत्साहन. खारघरच्या घटनेनंतर पाळणाघरांवर पालिकेचे काम सुरू.
अन्य आश्वासने :
रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगार केंद्र उभारणार, पदपथ, मैदाने, ओपन जिम, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, ड्रेनेज यांची उत्तम व्यवस्था करण्यासाठी विशेष योजना, पार्किंग धोरण, फेरीवाला धोरण, पदपथ फेरीवालामुक्त, तीनहातनाका, कॅडबरी जंक्शन येथे सब वे ची निर्मिती, रिंगरूट बससेवा, स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा केंद्र, कट्ट्यांंसाठी विविध उपक्रम, विमा योजना, डे केअर सेंटर, येऊरसह ठाण्यातील सर्व तलावांचे पुनरुज्जीवन करून आकर्षक पर्यटनस्थळे विकसित करणार, ठाणे पूर्वे, खारेगाव, कळवा व नागलाबंदर खाडीकिनारी चौपाटी विकसित करणार, ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास, नाटकांच्या तालमीसाठी हॉल उपलब्ध करून देणार, युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या ठाण्यातील सैनिकांच्या कुटुंबीयांना करामध्ये विशेष सवलत, आरक्षित सुविधा भूखंड केवळ नागरी सुविधांसाठी वापरणार, केंद्र व राज्याच्या विविध योजनांसाठी नागरी सुविधा केंद्र उभारणार, बीएसयूपीमध्ये दर्जेदार बांधकाम व पारदर्शकता (आता ही योजनाच बंद झाली आहे), ठाण्यात फुटबॉल व हॉकी स्टेडिअमची निर्मिती, खो खो, कबड्डी व कुस्तीसाठी विशेष क्रीडा संकुलाची निर्मिती करणार, जिम्नॅस्टिक्ससाठी दर्जेदार संकुल उभारणार, ई-गव्हर्नन्सचा अधिकाधिक वापर, पालिकेच्या कारभाराची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहोचवणार, सर्व स्मशानभूमी अद्ययावत करणार, जलवाहतूक योजना यशस्वी करणार, कोलशेत व बाळकुम येथे जेट्टी उभारून फेरीबोट व पर्यटकांसाठी विशेष पिकनिक स्पॉट विकसित करणार.