मुंबई, ठाण्यातील विकास प्रकल्प फ्लेमिंगो अभयारण्याच्या मुळावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 05:45 AM2019-11-09T05:45:59+5:302019-11-09T08:15:41+5:30

शासनाचे नियम कागदावरच : सी-लिंक, बुलेट ट्रेन, खाडीपुलांचे बांधकाम

Development Project at the Flamingo Sanctuary in Mumbai, Thane | मुंबई, ठाण्यातील विकास प्रकल्प फ्लेमिंगो अभयारण्याच्या मुळावर

मुंबई, ठाण्यातील विकास प्रकल्प फ्लेमिंगो अभयारण्याच्या मुळावर

googlenewsNext

नारायण जाधव

ठाणे : नोव्हेंबरपासून ठाणे खाडी परिसरात रुबाबदार आणि दिमाखदार दिसणाऱ्या गुलाबी रंगाच्या रोहित पक्ष्यांचे अर्थात फ्लेमिंगोंचे मोठ्या संख्येने आगमन होते. तसे ते सप्टेंबरपासूनच यायला लागतात; परंतु नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या असंख्य थव्यांमुळे खाडीपात्रात ठिकठिकाणी गुलाबी छटा डोळे दिपवून टाकतात. मात्र, अलीकडे या गुलाबी छटांवर विविध विकास प्रकल्पांनी गदा आणली आहे.
सप्टेंबरपासून ते फेबु्रवारी, मार्चपर्यंत या परिसरात ४० हजार ते सव्वालाखाहून अधिक रोहित पक्षी येतात. मात्र, अलीकडे या भागात होत असलेल्या मुंबई-शिवडी सी लिंकच्या बांधकामासह ठाणे खाडीवरील प्रस्तावित वाशी येथील तिसरा पूल, बुलेट ट्रेनसाठी जाणाºया ३.२७ हेक्टर क्षेत्रासह औद्योगिक परिसरातून सोडण्यात येणाºया सांडपाण्यामुळे रोहित पक्षी सुरक्षिततेसाठी दुसरी जागा शोधू लागले आहेत. हे विकास प्रकल्प असेच वाढले, तर या फ्लेमिंगो अभयारण्याचे अस्तित्व धोक्यात असल्याची प्रतिक्रिया पक्षीतज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.
वन्य आणि पक्षीप्रेमींच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने ६ आॅगस्ट २०१५ रोजी ठाणे खाडीचा परिसर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केला. ठाणे खाडी परिसरात गरुडांसह इतर पक्षी व कीटकांच्या विविध २०० प्रजातींची नोंद झाली आहे. यात १३ जातींच्या प्रकारांचे खेकडेही या ठिकाणी आढळतात. यामुळे ठाणे खाडीला जगातील एक महत्त्वाचे पक्षीक्षेत्र म्हणून ओळखले जाते.

सफारीसाठी बोटसेवा

फ्लेमिंगो अभयारण्यास जास्तीत जास्त पक्षीप्रेमींसह पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून राज्याच्या वन विभागाने नवी मुंबईतील ऐरोली येथे सागरी वन्यजीव विविधता केंद्राची स्थापना केली आहे. याठिकाणी फ्लेमिंगोंसह सागरी वन्यजीवांची माहिती देणारे केंद्र, माशांच्या विविध प्रजाती, शार्कचे सांगाडे ठेवण्यात आले आहेत. शिवाय बोटसेवाही सुरू केली आहे.

राज्य सरकारने ठाणे खाडी फ्लेमिंगो
अभयारण्याच्या १० कि.मी. परिघातील क्षेत्रात वनेतर बांधकामांवर निर्बंध घातले आहेत. अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत तेथील बांधकामांसाठी राज्य आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळांच्या स्थायी समितीची परवानगी आवश्यक आहे. मात्र, त्याचे कुठेच पालन होत नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सी-लिंकसाठी हजारो झाडांची कत्तल तर केली जात आहेच. शिवाय डोंगरही भुईसपाट केला जात आहे.

ठाणे खाडीचा परिसर हा फ्लेमिंगोसाठी अतिशय पोषक आहे. हवामान आणि त्यांना लागणारे खाद्य मुबलक आहे. त्यांची संख्याही वाढते आहे. मात्र, खाडीतील विविध विकास प्रकल्पांमुळे ते आपली नेहमीची जागा बदलून स्थलांतरित होत आहेत.
- सुधीर गायकवाड, पक्षी अभ्यासक, ठाणे
 

Web Title: Development Project at the Flamingo Sanctuary in Mumbai, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.