विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाईसाठी पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST2021-02-25T04:55:11+5:302021-02-25T04:55:11+5:30
भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याने, शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने ...

विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाईसाठी पथके तैनात
भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याने, शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने दंडात्मक मोहीम सुरू केली असून, कारवाईसाठी पथकेही स्थापन केली आहेत.
कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लग्न समारंभासाठी पालिका व पोलीस यांनी परवानगी दिली आहे किंवा नाही, याबाबत पथकातील कर्मचाऱ्यांनी हॉलमध्ये जाऊन खातरजमा करावी, परवानगी नसल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यावरील फेरीवाले सामाजिक अंतराचे पालन करीत नसतील, अशा फेरीवाल्यांवर २०० रुपये, तर बाजारपेठ परिसरातील दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत असतील, तर अशा दुकानदारांवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मंगल कार्यालय, हॉल, जिमखाना, हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, क्रीडांगणे, राजकीय मेळावे, सभागृह, तसेच शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होत नसेल, तर अशा आस्थापनांवर पाच हजारांची कारवाई केली जाणार आहे.
---------------------------------------------------------
रिक्षात केवळ दोन प्रवाशांना मंजुरी
शहरातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षात फक्त दोन प्रवासी बसविणे बंधनकारक केले असून, तसे न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून, शहरातील आरोग्यसेवा पुरविणाऱ्या खासगी दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी किंवा दवाखान्यात रुग्णांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसेल, तर अशा डॉक्टरांवरही दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी दिली आहे.