पायल तडवीप्रकरणी युवतींची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:40 IST2019-05-29T00:40:36+5:302019-05-29T00:40:50+5:30
तडवी आत्महत्या प्रकरणी श्रमजीवीच्या महिला ठिणगी युवती कार्यकर्त्यांनी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोस्टर, बॅनर घेऊन धडक मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली.

पायल तडवीप्रकरणी युवतींची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
ठाणे : मुंबईच्या नायर रूग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी श्रमजीवीच्या महिला ठिणगी युवती कार्यकर्त्यांनी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोस्टर, बॅनर घेऊन धडक मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांवर कडक करवाई करून त्यांना वेळीच निलंबीत करावे, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी लावून धरली.
जिल्ह्यातील आदिवासी, दलित युवती येथील जांभळीनाका येथे एक येऊन त्यांनी दुपारी हा धडक मोर्चा काढला. या युवती टेंभीनाका, सिव्हील रूग्णालय, सेंट्रल मैदान या मार्गाने येथील शासकीय विश्रामगृहाजवळ तो अडवण्यात आला. या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन महिला ठिणगीच्या या युवतींना शासनास सज्जड दम देऊन सुरक्षेची जोरदार मागणी केली. डॉ. तडवी यांची आत्महत्या नसून जातीयतेचा हा बळी आहे. त्या आदिवासी असल्याचे माहीत असूनही त्यांना जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी पानउतार करणे, अपमानीत करणे आदी कृत्य करण्यात आल्याचे या युवतींनी यावेळी स्पष्ट केले.
या जातीयतेच्या छळवणुकीतूनच डॉ. तडवी यांना आत्महत्या करावी लागली आहे. यास कारणीभूत असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. महिरे, डॉ. खंडेलवाल यांच्यावर अॅट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करा, त्यांना तत्काळ अटक करा, त्यांची डॉक्टर पदवी काढून घ्या, आदिवासी, दलित युवतींची छळवणूक होऊ नये म्हणून शासनाने तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करा आदी मागण्यांचे निवेदन या युवतींनी दिले. यामध्ये नंदा वाघे, जया पारधी, सुमन हिलम, संगिता भोमटे, सविता पाटील, कमल गुलूम, हिराबाई खांजोडे, प्रमिला जाधव, संगिता वाघे, भिमा निरगुडा, अनिता वाघे, नैना म्हस्कर दीपाली भोईर, निकिता रायात वैशाली पाटील आदी मोर्चात सहभागी झाल्या.