ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 08:07 IST2025-11-04T08:07:04+5:302025-11-04T08:07:20+5:30
वीज, पाणी तोडले, गाळ्यांवर बुलडोझर

ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी दिवा-शीळ भागातील दोस्ती कम्पाउंडमधील आठ अनधिकृत इमारतींवर सोमवारपासून कारवाईला सुरुवात केली. सकाळपासून येथील सुमारे हजार ते दीड हजार रहिवाशांनी पालिकेच्या कारवाईला कडाडून विरोध केला. अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांच्या अंगावर धावून गेल्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दुपारी ३ नंतर रहिवाशांची समजूत काढल्यानंतर एका इमारतीवर पालिकेने कारवाई सुरू केली. व्यापारी गाळ्यावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. अन्य दोन इमारतींच्या घरांचे दरवाजे, खिडक्या काढण्यात आल्या. आठही इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित केला.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या पथकाला कारवाई करण्यास विरोध करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
२०० पोलिसांचा फौजफाटा
दोन इमारतींवर महापालिकेने हातोडा मारल्यानंतर पावसाळा, सण, उत्सव असल्याने तसेच पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई लांबली होती. घरे रिकामी करण्याच्या नोटिसा तीन ते चार दिवसांपूर्वी बजावण्यात आल्या. सोमवारी सकाळी सहा वाजता ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग, चार उपायुक्त, सहा सहायक आयुक्त, २०० च्या आसपास पोलिस ताफा आणि एसआरपीएफची एक तुकडी अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली.
२१ अनधिकृत इमारतींवर यापूर्वीच झाली कारवाई
दिवा-शीळ खान कम्पाउंड भागात उभारलेल्या २१ अनधिकृत इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने यापूर्वीच कारवाई केली. त्यानंतर आता शीळ भागातील आणखी ११ इमारतींवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई प्रस्तावित केली. दोन इमारती पालिकेने पावसाळ्यापूर्वी जमीनदोस्त केल्या. उर्वरित इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य असून, एका इमारतीत एक खासगी शाळा आणि मशीद आहे. तसेच उर्वरित इमारतींमध्ये ३२९ कुटुंबे वास्तव्यास आहेत. इमारती साधारणपणे ५ ते ६ वर्षांपूर्वी उभारल्या असाव्यात. दोन विकासकांमध्ये अधिक लाभावरून झालेला वाद थेट न्यायालयात गेला. त्यावेळी या इमारती अनधिकृत असल्याचे उघड झाल्याने न्यायालयाने थेट कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती महापालिकेने दिली.