Demand for bankruptcy on eight employees found to be gambling | जुगार खेळताना आढळलेल्या आठ कर्मचाऱ्यांवर महावितरणाची धडक कारवाई
जुगार खेळताना आढळलेल्या आठ कर्मचाऱ्यांवर महावितरणाची धडक कारवाई

कल्याण: महावितरणच्या उल्हासनगर उपविभाग-४ अंतर्गत लालचक्की शाखा कार्यालयात कर्तव्यावर असताना जुगार खेळताना आढळलेल्या ८ कर्मचाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. सात कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, एका कंत्राटी कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले आहे. कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांचे कोणतेही गैरवर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचे महावितरणाने या कारवाईतून स्पष्ट केले आहे. 

वरिष्ठ तंत्रज्ञ टिकेकारा ओसेफ फ्रान्सिस, तंत्रज्ञ निखिल पांडुरंग पवार व महेश नारायण काळसईतकर, विद्युत सहाय्यक इलमोद्दीन मेहबूब शेख, संतोष मधुकर भोसले व मंगेश नंदू वानतकर, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक विनोद तुकाराम बोबले तसेच कंत्राटी कामगार सुनील पांचाळ अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हे कर्मचारी लालचक्की शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता कक्षातील टेबलवर जुगार खेळताना आढळून आले होते. लालचक्की आणि व्हीनस शाखा कार्यालयात कर्तव्यावर असतानाही पैसे लावून कार्यालयातच जुगार खेळण्याचे या कर्मचाऱ्यांचे वर्तन गांभीर्याने घेत महावितरणने तडकाफडकी कारवाई केली.

या कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन समाज माध्यमातूनही प्रसारित झाले असून, यातून महावितरणच्या प्रतिमेला हानी पोहोचली आहे. निलंबन कालावधीत या कर्मचाऱ्यांना जव्हार, मोखाडा उपविभागीय कार्यालयात हजेरी द्यावयाची आहे. कामावर असताना कर्मचाऱ्याचे कोणतेही गैरवर्तन गांभीर्यपूर्वक घेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा यातून महावितरणने दिला आहे.

Web Title: Demand for bankruptcy on eight employees found to be gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.