कुत्र्यांच्या हल्ल्यात ‘त्या’ हरणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:00 IST2019-01-31T23:00:02+5:302019-01-31T23:00:45+5:30
मृत झालेले हरीण वन्यजीव विभागाने काही वर्षांपूर्वी वैतरणा परिसरात सोडण्यात आलेल्या हरणांपैकी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कुत्र्यांच्या हल्ल्यात ‘त्या’ हरणाचा मृत्यू
वाडा : तालुक्यातील दाढरे गावाच्या हद्दीत कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे हरणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. हे मृत झालेले हरीण वन्यजीव विभागाने काही वर्षांपूर्वी वैतरणा परिसरात सोडण्यात आलेल्या हरणांपैकी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दाढरे गावालगत असलेल्या जंगलात भटकत असलेल्या या हरणाचा गुरु वारी सकाळी कुत्र्यांनी पाठलाग करून हल्ला केल्याने ते जखमी झाले होते. त्याला गावातील नागरिकांनी उचलून आणले. हरीण जखमी झाल्याबाबत त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या हरणाला वन विभागाने वैद्यकीय उपचारासाठी वाडा येथे आणत असताना रस्त्यातच ते दगावले. दरम्यान, पशू संवर्धन विभागाच्या दवाखान्यात दाखल केलेल्या हरणाचे शवविच्छेदन करण्यात आले असून हल्ल्यादरम्यान झालेल्या घबराटीमुळे हरणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका लघु पशू संवर्धन चिकित्सालयच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. एस. एस. कांबळे यांनी दिली. दरम्यान वैतरणा क्षेत्रातील कळंभे गावाच्या जंगलात वन्यजीव विभागाने तीन वर्षापूर्वी हरणांची पिल्ले सोडली होती. त्या हरणांपैकीच हे हरीण असल्याची चर्चा नागरिकांत आहे