अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 04:45 PM2017-09-27T16:45:48+5:302017-09-27T16:46:34+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. इक्बाल कासकरला ठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar's police custody extended four days | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ

Next

ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. इक्बाल कासकरला ठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांना ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने इक्बालची पोलिस कोठडी चार दिवसांनी वाढवली आहे.

इक्बाल कासकरच्या चौकशीतून रोज नवे खुलासे होत असून महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागत आहे. दरम्यान, कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम आणि इक्बाल कासकर हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. दोन्ही भावांमध्ये शेवटचे संभाषण भेंडीबाजार येथील हुसैनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर झाले होते. या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारीच इक्बाल कासकरचे घर आहे. मात्र त्याने सांगितेल्या माहितीमध्ये कितपत तथ्य आहे याबाबत तपासानंतरच माहिती मिळू शकेल असे, पोलिसांचे म्हणणे आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कासकरने बर्नर फोन आणि सिम बॉक्सच्या मदतीने दाऊदशी संपर्क साधला होता. बर्नर फोन विशेष कामांसाठी तयार केले जातात. हे फोन काम पूर्ण झाल्यानंतर नष्ट केले जातात. तसेच सिमबॉक्स कॉलमुळे ओळख लपवण्यास मदत होते.  

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी दोन वर्षांपूर्वी चार वेळा बोलणे झाल्याचा दावा करणा-या इक्बाल कासकर याने आपण व्यसनाधीन असल्याने दाऊद आपल्यावर नाराज असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना दिली होती. खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या कासकरच्या बँक अकाउंटबद्दल चौकशी केली असता आपले बँक अकाउंटच नसल्याची लोणकढी थापही त्याने मारली होती.

बिल्डरकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला कासकर दररोज उलटसुलट दावे करत असून पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. इक्बालने आपला भंगारचा धंदा असल्याचे सांगितले. तसेच तो राहत असलेल्या परिसरात त्याचा एक दुकानाचा गाळा असून त्याने तो भाड्याने दिला आहे. महिनाकाठी त्याचे ३० ते ४० हजार रुपये भाडे येते. त्यावरच आपला उदरनिर्वाह सुरू असल्याचा हास्यास्पद दावा त्याने केला आहे. आपल्याला वेगवेगळी व्यसने असून त्यामुळे दाऊद आपल्यावर नाराज असल्याचे त्याचे म्हणणे आहे. दाऊदबद्दल दररोज नवनवी तसेच परस्परविरोधी माहिती देऊन पोलिसांना गोंधळात टाकण्याची सराईत गुन्हेगाराची कार्यशैली कासकरने अवलंबली आहे.

बर्नर फोन म्हणजे नेमकं काय-
- हे फोन खास संभाषणासाठी तयार केले जातात.
-त्याचा एकदा वापर झाला की ते नष्ट केले जातात
- फोन करणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यासाठी 'सिम बॉक्स'ची वापर केला जातो.
-व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलच्या साहाय्याने कॉल करण्यासाठी सिम बॉक्सचा वापर केला जातो
-त्यामुळे सुरक्षा संस्थांना ते टॅप करता येत नाहीत 

पोलिसांच्या हाती इक्बाल कासकरचं जीमेल अकाऊंट लागलं आहे. पोलिसांनी गुगलकडे पासवर्ड आणि इतर माहितीही मागितली आहे.

मुलाने तयार करुन दिलं अकाऊंट 
जीमेलचा तपास केल्यानंतर आणखी महत्वाचे पुरावे हाती लागतील अशी पोलिसांना अपेक्षा आहे. यामुळे दाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकरभोवती फास आवळण्यास मदत मिळेल. इक्बाल कासकरच्या मोबाइल फोनची तपासणी केली असताना पोलिसांना या जीमेल आयडीची माहिती मिळाली. चौकशीदरम्यान इक्बाल कासकरने पोलिसांना सांगितलं की, मेल अकाऊंट माझ्या मुलाने तयार केलं आहे आणि पासवर्ड फक्त त्यालाचा माहिती आहे. मला मेल अकाऊंट वापरता येत नाही असा दावा इक्बाल कासकरने केला आहे. मात्र पोलिसांना त्याच्यावर विश्वास नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल कासकर मेल आणि इंटरनेटच्या सहाय्याने दाऊदसहित कुटुंब आणि अंडरवर्ल्डमधील इतर सदस्यांच्या संपर्कात होता. 

इक्बाल कासकरच्या मेलशी संबंधित सर्व लोकांवर पोलिसांची नजर आहे. सोबतच इक्बाल कासकरची एकाहून जास्त ई-मेल अकाऊंट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ठाणे पोलिसांचं सायबर सेल जीमेलवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत आहे. 

'दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, फोन टॅप होत असल्याच्या भीतीने कॉल करत नाही'
इकबाल कासकरने पोलिसांना याआधी माहिती दिली होती की, 'फोन टॅप होत असल्याच्या भीतीने दाऊद गेल्या तीन वर्षांपासून माझ्याशी आणि इतर नातेवाईकांशी बोलणं टाळत आहे'. मात्र आपण आपला दुसरा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचा दावा त्याने केला होता. आपल्या आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन अनीस ईद आणि इतर सणांना फोन करतो असं इकबाल कासकरने सांगितलं होतं. 'इकबाल कासकर तपासात सहकार्य करत नसून बोलण्यास नकार देत आहेत. मात्र त्याने आपण 1993 स्फोटातील आरोपी आपला मोठा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचं मान्य केलं आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली. 
 

Web Title: Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar's police custody extended four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.