शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निकटवर्तीय दत्तात्रय हाडप यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 13:23 IST2021-08-25T13:22:15+5:302021-08-25T13:23:15+5:30
Dattatraya Hadap : स्व. वेदशास्त्र संपन्न विश्वनाथ भट हाडप यांचे 10 वे वारसदार दादा उर्फ दत्तात्रय चिंतामण हाडप (वय 88) यांचे मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निकटवर्तीय दत्तात्रय हाडप यांचे निधन
अंबरनाथ : शिवकालिन प्रतापगड येथील भवानीमातेच्या मंदिरात भवानी देवीची दैनंदिन पुजा आरतीसाठी खुद्द शिवाजी महाराजांनी नेमणूक केलेले स्व. वेदशास्त्र संपन्न विश्वनाथ भट हाडप यांचे 10 वे वारसदार दादा उर्फ दत्तात्रय चिंतामण हाडप (वय 88) यांचे मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
मंगळवारी दुपारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णलायत दाखल करण्यात आले होते. ठाणे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री दीड च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपार नंतर दादा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रथम अंबरनाथ येथील डेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती आणखी खालावत असल्याने त्यांना ठाणे येथील विठ्ठल साय्यना रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री दीडच्या सुमारास उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात अभिनेता, निवेदक जगदीश व अभियंता जितेंद्र ही दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतू असा परिवार आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निकटवर्तीयमधील दादा हाडप हे एक आहेत. बाबासाहेब लिखित आणि दिग्दर्शित महानाट्य "जाणता राजा" मध्ये अनेक भूमिकांबरोबरच, प्रयोगापुर्वीची रोजची पहिली पूजा करण्याचा मानही दादांचाच होता. ते अंबरनाथ येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. शिवकाळापासून प्रतापगडावरील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पूजेचा मान हाडप कुटुंबीयांना आहे.