उड्डाणपुलाच्या उतारावरील नाल्याची उघडी जाळी वाहतुकीसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:10 PM2019-11-16T23:10:38+5:302019-11-16T23:10:46+5:30

अंबरनाथमध्ये अपघाताची शक्यता; नाल्यावरील लोखंडी पट्टीचे काम निकृष्ट

Dangerous for traffic on the flywheel | उड्डाणपुलाच्या उतारावरील नाल्याची उघडी जाळी वाहतुकीसाठी धोकादायक

उड्डाणपुलाच्या उतारावरील नाल्याची उघडी जाळी वाहतुकीसाठी धोकादायक

Next

- पंकज पाटील 

बदलापूर : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या उतारावर तयार केलेला नाला आता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्यावर उड्डाणपूल आणि रस्ता यांच्या मध्यभागी हा नाला बांधण्यात आला आहे. या नाल्यावरील लोखंडी पट्टीचे काम निकृष्ट झाल्याने आता सर्व पट्टी निघाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे चाक या पट्टीमध्ये अडकत आहे. या नाल्याच्या कामाला वर्षही उलटत नाही, तोच नाला धोकादायक झाल्याने आता नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

हुतात्मा चौकातील रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्यावर तो रस्ता उड्डाणपूल रस्त्याला जोडण्यात आला. पालिकेच्या अभियंत्यांच्या चुकीमुळे रस्त्याचा उतार जास्त करण्यात आला. त्यामुळे उड्डाणपूल आणि रस्ता यांच्यात खोल खड्डा निर्माण झाला. त्यातच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी नाला तयार करण्यात आला. सर्वाधिक वाहतूक ज्या रस्त्यावर सातत्याने होत असते, त्याच रस्त्यावर नाला तयार करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. आरसीसी नाला तयार करून त्यावर लोखंडी जाळी बसवण्यात आली. ती जाळी निकृष्ट असल्याने आता त्या नाल्यावरील लोखंडी जाळी आणि त्यावरील पट्टी निघाली आहे. अनेक ठिकाणी थेट लोखंडी पट्टी वाहनांच्या चाकांमध्ये अडकत आहेत. तर, काहींच्या थेट गाडीच्या बोनेटला अडकत आहे. या रस्त्यावरून मोठे वाहन गेल्यावर नाल्यावरील पट्टी वाहनाच्या दाबामुळे वर येत आहे, वर आलेली पट्टी ही लहान गाड्यांमध्ये अडकत आहे. अनेक दुचाकीस्वारांना त्याचा फटका सहन करावा लागला आहे. नाल्यावरील लोखंडी रॉड आणि त्यावरील पट्टी ही एका वर्षातच धोकादायक झाल्याने त्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली जात आहे.

दुसरीकडे या नाल्याच्या दोन्ही बाजूला निर्माण झालेला उतार कमी करण्यासाठी पुन्हा काँक्रिटचे काम करण्याची गरज व्यक्त होत आहे. अनावश्यक असा उतार तयार केल्याने उड्डाणपुलाला जोडणारा रस्ता हा धोकादायक बनला आहे. यासंदर्भात आधीच तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीकडे पालिकेने दुर्लक्ष केले. रस्त्याचे काम करतानाच त्याची कल्पना नागरिकांनी दिली होती. पालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने उड्डाणपुलाचा रस्ता धोकादायक झाला आहे. अवघ्या २० मीटरच्या रस्त्याचा उतार चुकल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

संबंधित नाल्यावरील पट्टीची दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. नाल्यावरील पट्टी दुरुस्त करण्यायोग्य नसल्यास ती बदलण्यात येईल.
- देविदास पवार, मुख्याधिकारी

Web Title: Dangerous for traffic on the flywheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात