डहाणू किनारपट्टीत प्रदूषण

By Admin | Updated: June 2, 2016 01:21 IST2016-06-02T01:21:19+5:302016-06-02T01:21:19+5:30

डहाणूच्या परिसरात धाकटी डहाणू, चिंचणी, डहाणू खाडी, वाढवण, नरपड, आगर,चिखले, झाई, गूंगवाडा, तडीयाळ,े वरोर या भागात पारंपारिक मासेमारीतून अनेक कूटूंबाचा उदरनिर्वाह चालतो

Dahanu coastal pollution | डहाणू किनारपट्टीत प्रदूषण

डहाणू किनारपट्टीत प्रदूषण

शौकत शेख,  डहाणू
डहाणूच्या परिसरात धाकटी डहाणू, चिंचणी, डहाणू खाडी, वाढवण, नरपड, आगर,चिखले, झाई, गूंगवाडा, तडीयाळ,े वरोर या भागात पारंपारिक मासेमारीतून अनेक कूटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, अलिकडे जलप्रदूषणाचे परिणाम दिसू लागल्याने मासेमारी संकटात आली असल्याचे मच्छीमार सोसायटींच्या अहवालातून दिसू लागले आहे. त्यामुळे मच्छीमारांना सरकारने मदत द्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
तारापूर एमआयडीसीतून रासायनिक सांडपाणी समुद्र व खाडीत, सोडले जात असल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. जल प्रदूषण वाढले असून ते जलचरांच्या जीवावर बेतले आहे. डहाणूच्या सागर किनारपटटीला मृत मासे आढळून आल्याने सागरी प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याची भीती मच्छीमारांत दिसू लागली आहे. खाड्यांमध्ये मच्छीमार आकवडी, बगळी,भाला, आसू, झोळणे, पाग, वावरी, विळा, गळ, वाणे, खांदा, जाळी, डोल, फघ अशा पारंपारिक साधनांचा अधिक वापर करतात. या साधनांच्या साहाय्याने मच्छीमार यांत्रिक होड्यांच्या आधारे मासेमारी करतात. या मासेमारीतून निवटे, शिवल्या, चिंबोरी, किळशी, जिताडा, चिवणी, बोइट, ढोमा, कोळंबी, शिंगाला, हेकरु , वाकटी, मांदेली, शेवंड, तांब, पाला, पापलेट, बोंबिल, घोळ, रावस, कोळिम, खुबे,करपाली अशी विविध प्रकारची मासळी पकडतात. डहाणू थर्मल पॉवर स्टेशनला लागणारा दगडी कोळसा मोठ्या जहाजातून लहान बार्जमध्ये उतरवताना समुद्रात पडल्याने, तसेच सततच्या वाहतुकीमुळे तेल सांडल्याने त्याचे दुष्परिणाम मच्छीवर दिसू लागले आहेत. तर नजीकच्या तारापूर एमआयडीसीतून होणाऱ्या दूषित पाण्याचे परिणाम जाणवू लागले आहे. किनारपटटीच्या भागात मासे मिळेनासे झाले आहेत. काही वर्षांपासून सागरी प्रदूषणामुळे मत्स्य व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. डहाणू परिसर हा जलप्रदूषणाने ग्रासला असून याचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्र्रमाणात होतो आहे की, या प्रदूषित पाण्यामुळे सर्वच जलचरांचे ही अस्तित्व सध्या धोक्यात आले
आहे. घोळ, दाढा मच्छीसाठी प्रसिद्ध असलेल्या डहाणू किनारपट्टीवर ६०० ते ७०० बोटींद्वारे मच्छीमारी चालते. मात्र तारापूर एमआयटीसीतून रासायनिक सांडपाणी समुद्र, खाडी, नदी-नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने डहाणू किनारपट्टीवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नजीकचा काळ हा मासेमारीसाठी दुष्काळाचा असणार आहे.

Web Title: Dahanu coastal pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.