खिशात पैसे असूनही ग्राहकांचे हात रिकामे
By Admin | Updated: November 10, 2016 03:08 IST2016-11-10T03:08:52+5:302016-11-10T03:08:52+5:30
बड्या रकमेच्या नोटा रद्द झाल्यानंतर बुधवारी सकाळी ठाणे मार्केटमध्ये भाजी-फळे खरेदी करण्याकरिता गेलेल्यांकडून अनेक विक्रेत्यांनी ‘त्या’ नोटा न घेतल्याने

खिशात पैसे असूनही ग्राहकांचे हात रिकामे
ठाणे : बड्या रकमेच्या नोटा रद्द झाल्यानंतर बुधवारी सकाळी ठाणे मार्केटमध्ये भाजी-फळे खरेदी करण्याकरिता गेलेल्यांकडून अनेक विक्रेत्यांनी ‘त्या’ नोटा न घेतल्याने अनेक ग्राहकांना अक्षरश: रिकाम्या हाती परतावे लागले.
ठाण्यातील मंडईत सकाळी ताजी भाजी, फळे येतात. ती खरेदी करण्याकरिता दररोज गर्दी असते. घरातील हजार, पाचशेच्या नोटा घेऊन खरेदीला आलेल्यांकडून या बाद झालेल्या नोटा स्वीकारण्यास विक्रेत्यांनी साफ नकार दिला. आम्ही ज्या होलसेल विक्रेत्यांकडून भाजी खरेदी केली, त्यांनीही आमच्याकडून पैसे घेतले नाहीत. त्यामुळे पाहिजे तर उधार भाजी घ्या, पण रद्द झालेल्या नोटा आमच्या माथी मारू नका, असे भाजी, फळविक्रेते बुधवारी सांगत होते. उधार भाजी खरेदी करणे, ही कल्पनाच काहींना न पटल्याने त्यांनी भाजी खरेदीचा नाद सोडून घरचा रस्ता धरला. ज्यांच्या घरी भाजी आली तरच चूल पेटणार होती, त्यांनी खिशातून इकडूनतिकडून सुटे पैसे काढून थोडीफार भाजी खरेदी केली आणि दिवस साजरा केला.
रिक्षा, बसमध्येही सुट्या पैशांवरून प्रवासी आणि चालक-वाहक यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या. सुटे पैसे हवे असल्याने काहींनी चक्क पाचशेच्या नोटा रिक्षावाले किंवा कंडक्टर यांच्यापुढे धरल्याने वादाला सुरुवात झाली. अन्य प्रवासी व रिक्षाचालक यांनी मध्यस्थी करून हे वाद मिटवले. अनेक मोठी दुकाने, शोरूम्समध्येही बुधवारी दिवसभर ग्राहकांअभावी शांतता पाहायला मिळाली. महागड्या वस्तू खरेदी करायला जायचे तर हजार-पाचशेच्या नोटा चालत नाहीत आणि खरेदीकरिता शंभराच्या नोटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे ठाण्यातील अनेक चकचकीत शोरूममधील कर्मचारी दिवसभर अक्षरश: माश्या मारत बसले होते. (प्रतिनिधी)