मटकाकिंग बाबू नाडरवर हल्ला करणारे अभिलेखावरील गुन्हेगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 03:19 IST2019-09-24T03:19:04+5:302019-09-24T03:19:53+5:30
ठाणे : मटकाकिंग बाबू नाडरवर खुनी हल्ला करणारा हरेष तेलुरे (२८) याच्यासह त्याचाच सतरावर्षीय अल्पवयीन भाऊ हे दोघेही गुन्हेगारी ...

मटकाकिंग बाबू नाडरवर हल्ला करणारे अभिलेखावरील गुन्हेगार
ठाणे : मटकाकिंग बाबू नाडरवर खुनी हल्ला करणारा हरेष तेलुरे (२८) याच्यासह त्याचाच सतरावर्षीय अल्पवयीन भाऊ हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. हरेषवर चार तर त्याच्या भावावर सहा गुन्ह्यांची नोंद आहे. या घटनेच्या सहा दिवस आधीच अल्पवयीन भाऊ बालसुधारगृहातून सुटला होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली.
नाडरवर सतरावर्षीय या हल्लेखोराने पूर्ववैमनस्यातून चाकूचे सात ते आठ वार केले. बेकायदेशीरपणे तलवार बाळगल्या-प्रकरणी त्याला तीन महिन्यांपूर्वीच कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची भिवंडी बालन्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली होती. याच गुन्ह्यात त्याची एक आठवड्यापूर्वीच सुटका झाल्याने तो बाहेर आला होता. नाडरच्या माणसांशी त्याचा वाद झाल्याने त्याने आपल्या दोन्ही भावांच्या मदतीने त्याच्यावर २१ सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास खुनी हल्ला केला. त्यावेळी हा हल्ला सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या विनोद मोहिते (४०) याच्यावरही त्याने हल्ला केला होता. दरम्यान, नाडर याच्या पोट आणि पाठीवर दोन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया एका खासगी रुग्णालयात पार पडल्या असून त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्याप्रकरणी हरेष तेलुरे याच्यासह त्याच्या १७ आणि १६ वर्षीय दोन अल्पवयीन भावांनाही पोलिसांनी कसारा रेल्वेस्थानक येथून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हरेषला सोमवारी राज्य राखीव दलासह मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ठाणे न्यायालयात हजर केले असता त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
नाडरलाही झाली होती अटक
कोपरीत मटका चालविणाºया बाबूला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडे जुगार हरणाºया दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. याच प्रकरणात तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या आदेशाने त्याला अटकही झाली होती. त्याच्या अड्ड्यावर अनेकवेळा धाड टाकूनही तो मात्र पोलिसांना हुलकावण्या देत होता.
हल्लेखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
हल्लेखोरांपैकी हरेष याच्यावर हाणामारीचे चार गुन्हे नोंद आहेत. तर, त्याच्या सतरावर्षीय भावावरही खुनाच्या प्रयत्नासह सहा गुन्हे कोपरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याने सात महिन्यांपूर्वीही एकाच्या भांडणात मध्यस्थी करणाºया हरुण रेलवानी यांच्यावर खुनी हल्ला केला होता. हरुण याने त्याला चोरीच्या गुन्ह्यातही पकडून दिले होते. याच रागातून हरुण याच्याही पोटावर त्याने वार केले होते. व्यसनी आणि कोणताही कामधंदा न करणारा हा हल्लेखोर नशेच्या आहारी गेल्यानंतर असे गैरप्रकार करीत असल्यामुळे पोलिसांपुढे त्याची डोकेदुखी झाल्याचे बोलले जाते.