शेवटच्या तीन दिवसांत गर्दी
By Admin | Updated: January 31, 2017 03:17 IST2017-01-31T03:17:13+5:302017-01-31T03:17:13+5:30
युती तुटली असली आणि दुसरीकडे आघाडी झाली असली तरीदेखील सर्वच पक्षांत बंडखोरी अटळ मानली जात असल्याने अद्यापही शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने

शेवटच्या तीन दिवसांत गर्दी
ठाणे : युती तुटली असली आणि दुसरीकडे आघाडी झाली असली तरीदेखील सर्वच पक्षांत बंडखोरी अटळ मानली जात असल्याने अद्यापही शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची यादी गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी उसळणार असल्याचे दिसत आहे. त्यातच निवडणूक विभागामार्फत आॅनलाइन अर्ज मागवले जात असल्याने या चारही पक्षांनी एकाच वेळेस उमेदवारी याद्या जाहीर केल्या, तर मात्र आॅनलाइन प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होऊन परिणामी सर्व्हर डाउन होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सर्वच पक्षांनी हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे यंदा उमेदवारी अर्ज हे आॅनलाइन आणि आॅफलाइन अशा दोन्ही स्वरूपांत भरावयाचा असल्याने अनेक उमेदवारांची आधीच भंबेरी उडालेली आहे. त्यात आता चारही प्रमुख पक्षांसह मनसेनेदेखील आपली उमेदवारी यादी जाहीर न केल्याने त्याचा परिणाम आता पुढील तीन दिवसांत दिसून येणार आहे. शिवसेना उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री यादी जाहीर करणार असून भाजपादेखील २ फेब्रुवारीला यादी जाहीर करणार आहे.
लोकशाही आघाडीकडूनदेखील १ किंवा २ तारखेलाच यादी जाहीर होणार आहे. शिवाय, मनसेदेखील १ तारखेला यादी जाहीर करणार आहे. त्यामुळे असे जर झाले, तर आॅनलाइन प्रक्रियेच्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी ताण येणार आहे.
अनेक उमेदवार आॅनलाइन पद्धतीने आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणुकीच्या वेबसाइटवर लॉगिन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेकांनी वेबसाइटवर जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लॉगिन केल्यास तीवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.
परिणामी, सर्व्हर डाउन होण्याची भीतीदेखील अनेकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत, निवडणूक अधिकारी ओमप्रकाश दिवटे यांच्याशी संपर्कसाधला असता ही वेबसाइट निवडणूक आयोगाने तयार केली असून सर्व्हर डाउन होणार नाही, याची खबरदारीदेखील आयोगाने घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी अनेक उमेदवारांमध्ये आॅनलाइनची भीती कायम असून दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांसारखी आमची अवस्था झाली, तर काय करायचे, असा पेच त्यांना सतावत आहे.
दरम्यान, यावरदेखील काही पक्षांनी तर्क लढवला असून ज्यांचे तिकीट पक्के आहे, त्यांना आधीच आॅनलाइन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी सांगण्यात आले असून उमेदवारी निश्चित होताच, फार्म अपलोड करून त्याची प्रिंट काढून एबी फॉर्म जोडून त्यावर स्वाक्षरी करून तो अर्ज निवडणूक विभागाकडे देण्याची तयारीदेखील पूर्ण झाल्याचा दावा त्यांच्यातर्फे करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)