जितेंद्र कालेकर लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यात भरदिवसा एक विकृत तरुण रस्त्यावरून जाणाऱ्या चार ते पाच विद्यार्थिनींसोबत खुलेआम अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग करतो, उल्हासनगरमध्ये विनयभंगातील आरोपीने जामिनावर सुटल्यानंतर पीडितेच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष केला. अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार, विनयभंगाच्या तर रोज केस दाखल होत आहेत. कायद्याची जरब संपली आहे. पोलिसांचे भय उरलेले नाही. समाजातील विकृती पराकोटीची वाढली असून, सुसंस्कृत वगैरे टेंभा मिरवणाऱ्या ठाणे जिल्ह्यात कायद्याचे राज्य उरलेले नसून विकृतीला माेकळे रान मिळत आहे. सावरकरनगर, लोकमान्यनगर भागांतून जाणाऱ्या पाच मुलींचा विनयभंग करणाऱ्या शंकर सोनी (३२) याला गुन्हे अन्वेषण विभाग आणि वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध सात वर्षांपूर्वीही कळवा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. छेडछाड करण्यात सराईत असलेला हा आरोपी बिनधास्त फिरत होता व तोच गुन्हा पुन:पुन्हा करत होता. अनेक हद्दपार गुंड पोलिसांचे भय न बाळगता जिल्ह्यातील बंदी केलेल्या परिसरात फिरताना पकडले जातात. कदाचित जेलमध्ये दोन वेळा बसून खायला मिळत असेल. शिवाय मोबाइलपासून गांजापर्यंत सर्व खातीरदारी होत असल्याने गुन्हेगारांना तेच तेच गुन्हे पुन्हा करून जेलमध्ये जाण्यात भय वाटत नसावे. पोलिस व्हॅनमध्ये केक कापलाउल्हासनगरातील रोशन झा या गुंडाला दोन वर्षांपूर्वी आधारवाडी तुरुंगातून कल्याण न्यायालयात सुनावणीला आणले असता त्याने पोलिस व्हॅनमध्ये केक कापला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दोन पोलिस निलंबित झाले. पोलिस कोठडी असो की जेल; तेथे प्रत्येक गोष्ट कैद्याला पुरवण्याकरिता पैसे घेतले जातात हे उघड गुपित आहे. कुख्यात गुंड वैद्यकीय तपासणी किंवा कोर्टाची तारीख या निमित्ताने खासगी फ्लॅटवर जाऊन बायको किंवा मैत्रिणींसोबत मौजमजा करताना सापडल्याचे प्रकार उघड झाले होते. याच फ्लॅटवर खंडणी वसुलीच्या, मांडवलीच्या भेटीगाठी होतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पोलिसांची विश्वासार्हता पूर्णत: लयाला गेली आहे.
उल्हासनगरात कहरतडीपार असूनही अंशू झा उल्हासनगरात २७ एप्रिल २०२५ रोजी दारू पित होता. यातून झालेल्या वादात एक कुटुंब त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी त्याचा भाऊ रोहित याने संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन एका मुलीचा विनयभंग केला. परिसरातील काही लोकांनी मध्यस्थी करीत त्याला चोप दिला. या प्रकरणी अंशू आणि त्याचा भाऊ रोहित यांना पाेलिसांनी अटक केली. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याने तक्रारदार कुटुंबातील एकाला अटक झाली. १७ जुलैला रोहितची जामिनावर सुटका झाल्यावर त्याच्या सहकाऱ्यांनी रॅली काढून पीडितेच्या घरासमोर आतषबाजी करून ढोलताशे वाजविले. त्याआधी पीडितेच्या भावानेही त्याची सुटका झाल्याने जल्लोष केला. बिहार, झारखंडमध्ये गुंडांनी दहशत वाढविण्याकरिता सुटकेनंतर ‘शोभायात्रा’ काढाव्यात, तसे प्रकार उल्हासनगरात घडतात आणि पोलिसांना त्याची गंधवार्ता लागत नाही, हे संतापजनक आहे.