अपघातातील साध्वीवर ठाण्यात अंत्यसंस्कार"
By Admin | Updated: April 24, 2017 03:33 IST2017-04-24T03:33:26+5:302017-04-24T03:33:26+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावरील लोढाधाम येथून ठाण्याकडे निघालेल्या जैन साध्वींच्या जथ्याला शनिवारी माणकोलीजवळ ट्रकने जोरदार

अपघातातील साध्वीवर ठाण्यात अंत्यसंस्कार"
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील लोढाधाम येथून ठाण्याकडे निघालेल्या जैन साध्वींच्या जथ्याला शनिवारी माणकोलीजवळ ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोन साध्वींचा मृत्यू झाला तर दोन साध्वी जखमी झाल्या होत्या. मृतांपैकी एका साध्वीवर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर दुसऱ्या साध्वीचा मृतदेह तिचे नातेवाईक झारखंड येथे घेऊन गेले.
भिवंडी येथील लोढाधाम येथून चार साध्वी तीर्थाटन करून ठाणे शहराकडे जात होत्या. त्या वेळी या साध्वी माणकोली बायपास नाक्याजवळील अरुणकुमार क्वारीसमोर असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकचालकाने साध्वींच्या जथ्याला धडक दिली. या अपघातात साध्वी रंजना हिराचंद जैन (५२, रा. ठाणे) व मदतनीस रत्नी (४०, रा. झारखंड) या दोन साध्वींचा मृत्यू तर साध्वी शकुंतला चोपडा व मदतनीस सुमोनी माझी या दोन साध्वी जखमी झाल्या होत्या. यातील साध्वी रंजना जैन यांच्यावर ठाण्यात बाळकुम येथील साकेत पाइपलाइन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मदतनीस रत्नी हिचे शव तिचे नातेवाईक झारखंड येथे घेऊन गेले. जखमी झालेल्या साध्वी शकुंतला चोपडा व मदतनीस सुमोनी माझी या दोघींवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी ट्रकचालक दया शंकर यादव यास नारपोली पोलिसांनी अटक केली. पण या चालकाला जामीन मिळाला आहे. (प्रतिनिधी)