चिमुकल्यांनी बनवले चिमण्यांसाठी घरकुल!
By Admin | Updated: March 20, 2017 02:06 IST2017-03-20T02:06:13+5:302017-03-20T02:06:13+5:30
येथील संकल्प इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी चिमण्यांसाठी शेकडो घरकुले तयार करून त्यांना निवारा दिला आहे. जुन्या वह्या-खोक्यांच्या पुठ्ठ्यांचा वापर करत

चिमुकल्यांनी बनवले चिमण्यांसाठी घरकुल!
ठाणे : येथील संकल्प इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी चिमण्यांसाठी शेकडो घरकुले तयार करून त्यांना निवारा दिला आहे. जुन्या वह्या-खोक्यांच्या पुठ्ठ्यांचा वापर करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने ही घरटी बांधली.
संकल्प इंग्लिश स्कूल या शाळेत २० मार्च हा जागतिक चिमणी दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जात आहे. या शाळेत लाकडी खोक्यांपासून बनवलेली छोटीछोटी घरटी तसेच प्लास्टिक बाटल्यांपासून तयार केलेले फिडर शाळेच्या आवारात लावले आहे. या घरट्यांमधून चिमण्या आपली पिले जन्माला घालत आहेत. शाळेच्या आवारात चिमण्यांच्या खाण्याची (दाण्याची) व पाण्याची सोयही केलेली आहे. त्यामुळे हरवलेल्या चिमण्यांची चिवचिव या शाळेच्या आवारात ऐकायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने या गोष्टी रोजच्या रोज करण्याकडे शाळेचा कल असतो. विशेष म्हणजे विद्यार्थीदेखील मोठ्या आवडीने हे काम करतात.
जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘संकल्प’ने चिमण्यांसाठी शेकडो घरटी (स्पॅरो हाउस) बनवण्याचे ठरवले. टाकाऊतून टिकाऊ या सदराखाली जाड पुठ्ठ्यांपासून घरटी बनवण्याची मोहीम हाती घेतली. ती घरटी प्रत्येक विद्यार्थ्याला वाटण्यात आली. विद्यार्थी ती घरटी आपापल्या घरी योग्य ठिकाणी लावणार आहेत. शेकडो विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थ्यांनी जरी चिमणीने घरटे बांधले, तरी शाळेला फार मोठे यश मिळेल, असा विश्वास शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती परब यांनी व्यक्त केला.
प्राणी वाचवा, निसर्ग वाचवा, या दृष्टीने ‘चिमणी बचाव’साठी हा वेगळा उपक्रम करण्याचे ठरवल्याचे संस्थापक राज परब यांनी सांगितले. घरटी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर कलाशिक्षक रुची पारकर, प्रणाली गिरी, श्रद्धा धेंडे, शीतल जाधव, यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)