नशेसाठी पैसे दिले नाही म्हणून केली मामेभावाची हत्या; भिवंडीमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 18:04 IST2021-10-19T18:04:23+5:302021-10-19T18:04:28+5:30
समवयस्क असल्याने ती तिघेही चांगले मित्र देखील होते.

नशेसाठी पैसे दिले नाही म्हणून केली मामेभावाची हत्या; भिवंडीमधील घटना
- नितिन पंडीत
भिवंडी- नशेसाठी पैसे दिली नाहीत म्हणून मित्राच्या मदतीने नात्याने मामे भाऊ असलेल्या आपल्या सहकारी मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना भादवड ते पोगाव पाईप लाईन रस्त्यात सोमवारी घडली आहे . याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांना मंगळवारी न्यायालयात हजार केले असता २५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
मोहमद आसिफ सलीम अंसारी ( वय १९ ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे तर शफिक रफिक अंसारी ( वय १९ रा . शांतीनगर ) अमीर उर्फ फैजान रज्जाक सय्यद ( २० ) असे हत्या करणाऱ्या आरोपींची नवे आहेत . हे तिघेही मित्र असून नात्याने मयत आसिफ हा एका आरोपीचा मामे भाऊ लागत आहे.
समवयस्क असल्याने ती तिघेही चांगले मित्र देखील होते . सोमवारी हे तिघे शांतीनगर परिसरात असलेल्या भादवड ते पोगाव या मुंबई महापालिकेच्या पाईप लाईनवर फिरायला गेले होते त्यावेळी मयत आसिफ कडे दोघा आरोपी मित्रांनी नशेसाठी पैसे मागितले ते देण्यास आसिफने नकार दिल्याने त्यांच्या कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी शफिक व आमिर या दोघांनी दगडाने आसिफची हत्या केली . याप्रकरणी मयत असिफची आत्या शकीला रमजान अंसारी हिने शांतीनगर पोलीस ठाण्यात शफिक व अमीर या दोघांविरोधात तक्रार दाखल केली असता शांतीनगर पोलिसंनी या दोघांनाही अटक केली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश बडाख करीत आहेत .